Join us

पे अ‍ॅण्ड पार्क विरोधात मनसेची सह्यांची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 2:29 AM

मुंबई महानगरपालिकेने टप्प्याटप्प्याने सुरू केलेल्या पे अ‍ॅण्ड पार्क धोरणाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रान पेटविण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने टप्प्याटप्प्याने सुरू केलेल्या पे अ‍ॅण्ड पार्क धोरणाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रान पेटविण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या ‘ई वॉर्ड’ परिसरातील बकरी अड्डा येथील ना.म. जोशी मार्गावर सुरू केलेल्या पे अ‍ॅण्ड पार्क धोरणाविरोधात मनसेने बुधवारी सह्यांची मोहीम घेत विरोध प्रदर्शनाला सुरुवात केली आहे.यासंदर्भात मनसेचे विभागाध्यक्ष विजय लिपारे यांनी सांगितले की, मनपाच्या पे अ‍ॅण्ड पार्क धोरणाविरोधात याआधीच मनसेने कडाडून विरोध केलेला आहे. याशिवाय जून महिन्यापर्यंत मनपाने धोरण रद्द केले नाही, तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही मनसेने दिला होता. या धोरणाचे तोटे लोकांना माहीत नाहीत. त्यामुळे जनजागृती करून लोकचळवळ उभारण्यासाठी ही सह्यांची मोहीम घेत असल्याचे लिपारे यांनी स्पष्ट केले. बकरी अड्डा परिसरानंतर भायखळा पूर्वेकडील ई. एस. पाटणवाला मार्गावरही सह्यांची मोहीम राबविण्यात येईल, तसेच दोन्हीकडील सर्व सह्या एकत्रित करून ई वॉर्डचे सहायक महापालिका आयुक्त आणि मनपा आयुक्तांना पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, भायखळा पश्चिमेकडील बकरी अड्डा येथील पे अ‍ॅण्ड पार्कचा ब वर्गात समावेश केलेला असताना, भायखळा पूर्वेकडील ई. एस. पाटणवाला मार्गाचा समावेश अ वर्गात केल्याने, विभागातील नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुळात गिरणगाव परिसर म्हणून ओळख असलेल्या भागात वाहनतळासाठी अ वर्गाचे दर आकारणेच चुकीचे असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.