Join us  

भांडुप विक्रोळीतून मनसेचा सुपडा साफ

By admin | Published: February 25, 2017 3:40 AM

एस वॉर्डमध्ये शिवसेनेचा जोर कायम असून १३ पैकी तब्बल ७ जागांवर त्यांनी विजय मिळवला आहे. यात मनसे लाटेत वळलेली मते पुन्हा आपल्याकडे वळविण्यास सेनेला यश आले आहे.

मुंबई : एस वॉर्डमध्ये शिवसेनेचा जोर कायम असून १३ पैकी तब्बल ७ जागांवर त्यांनी विजय मिळवला आहे. यात मनसे लाटेत वळलेली मते पुन्हा आपल्याकडे वळविण्यास सेनेला यश आले आहे. त्यामुळे एस वॉर्डमधून मनसेचा सुपडा साफ झाला आहे. भाजपाला या ठिकाणी विशेष असा प्रभाग पाडता आलेला नाही. भांडुप आणि विक्रोळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्या पालिका निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसे लाटेत येथील शिवसेनेची मते त्यांच्या बाजूने वळली.या लाटेत पाच ते सहा नगरसेवक मनसेचे निवडून आले होते. त्यामुळे सेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडले होते. यंदाच्या निकालात ती मते पुन्हा आपल्याकडे आणण्यात शिवसेनेला यश आले. त्यांचे सात उमेदवार चांगल्या मतांनी निवडून आले. मनसेच्या अनिषा माजगावकर, वैष्णवी सरफरे यांना पक्षांतर्गत रुसवेगिरीचा फटका बसला आणि हजाराहून अधिक मतांनी हार पत्करावी लागली. तर दुसरीकडे प्रत्येक निवडणुकीत पराजय होत असलेले भाजपाचे दीपक दळवी यांनी त्यांच्या पत्नी साक्षीला ११२ मधून उभे केले होते. त्यांच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष होते. अशात त्यांच्या पत्नीनेही शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना धोबीपछाड दिला. तर पालिका गटनेता धनंजय पिसाळ आणि आमदार अशोक पाटील यांना धक्का बसला. त्यांच्या पत्नी येथे मागे पडल्या. (प्रतिनिधी)