मुंबई - एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसेने रेल्वे स्टेशन परिसरात बसणा-या फेरीवाल्यांविरोधात रुद्रावतार धारण केल्यामुळे मुंबईतल्या अनेक रेल्वे स्थानकांनी मोकळा श्वास घेतला. दादर रेल्वे स्थानक परिसरात बसणा-या अनधिकृत फेरीवाल्यांवर पेपरमध्ये बरचं लिहील गेलं, तिथून जाणारे लोकही संताप व्यक्त करायचे पण बदल काही होतं नव्हता. अखेर मनसेनं आंदोलन केल्यानंतर संपूर्ण चित्रच पालटलं. आता दादर रेल्वे स्टेशनच्या आसपासचा फेरीवाला मुक्त परिसर पाहून हे दादरच आहे का ? असा प्रश्न अनेकांना पडतो.
आज मुंबई शहर आणि उपनगरातल्या रेल्वे स्थानकांच्या आसपासचा परिसर जो मोकळा दिसतोय त्याचे श्रेय मनसेला जातं. 'करुन दाखवलं' ही खरतर शिवसेनेची महापालिका निवडणुकीतली प्रचाराची टॅगलाइन पण आज मनसैनिक रेल्वे स्टेशन्स फेरीवाल मुक्त करुन दाखवले हे हक्काने म्हणू शकतात तसचं गुंडगिरी सुद्धा करुन दाखवली हे मनसेला लागू पडतं. काँग्रेस कार्यालयावर हल्ला करुन आपण ठोकशाहीमध्येही मागे नसल्याचं मनसेनं दाखवूनं दिलं आहे.
विक्रोळीत मनसे कार्यकर्त्यांना मारहाण झाल्यानंतर संजय निरुपम यांनी टि्वट करुन मनसेच्या कार्यकर्त्यांना गुंड म्हटलं होतं. विक्रोळीत मनसेच्या गुंडांनी मार खाल्ला त्यांनी गुंडगिरी सोडून द्यावी असं ते म्हणाले होते. मनसेच्या कार्यकर्त्यांनी संजय निरुपम यांचे हे शब्द भरपूरच मनाला लावून घेतले आणि थेट काँग्रेस कार्यालय फोडून गुंडगिरी काय असते ते निरुपम यांना दाखवून दिलं.
मुंबईत दोन ठिकाणी फेरीवाल्यांकडून मनसे कार्यकर्त्यांना मार पडल्यामुळे थेट पक्षाची रेप्युटेशनच पणाला लागली होती. साहेबांनी थेट विभाग अध्यक्षांची बैठक घेऊन यापुढे मार खाल्ला तर पदावरुन काढून टाकू असा इशाराच दिला. मागच्या तीन वर्षातील सलगच्या पराभवांमुळे आधीच कार्यकर्त्यांची वानवा असताना उरला सुरला दरारा टिकवण्यासाठी असं काही तरी करुन दाखवणं मनसेची गरज बनली होती. त्यातूनच काँग्रेस कार्यालयावर हा हल्ला झाला. त्यामुळे यापुढे गुंडगिरी मनसेने करुन दाखवली हे म्हणावं लागेलं.