मुंबई - मुंबईत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्य सरकारच्या धोरणांविरोधात मोर्चाची हाक दिली आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसेच्या संताप मोर्चा पार पडला. एलफिन्स्टन रेल्वे स्टेशन पुलावरील चेंगराचेंगरीनंतर मुंबईतील 'लोकल वाहतूक सुधारणा' हा या मोर्चाचा मुख्य उद्देश होता. हा मोर्चा मेट्रो सिनेमागृह ते चर्चगेट स्टेशनपर्यंत काढण्यात आला.
एलफिन्स्टन पादचारी पुलावरील चेंगराचेंगरीचा निषेध व्यक्त करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ब-याच काळानंतर मोठ्या आंदोलनाची घोषणा केलेली होती. बुलेट ट्रेनला विरोध करत आधी रेल्वे प्रवाशांसाठी पुरेशा सोयी-सुविधा देण्याची त्यांची मागणी होती. दरम्यान, मनसेला मोर्चा काढण्याची परवानगी पोलिसांनी दिलेली नव्हीत.
राज ठाकरे यांनी पुकारलेले आंदोलन यशस्वी करण्यासाठी मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे लोकलमध्ये चढून बुधवारी मोर्चाबाबत जनजागृती करताना दिसले. खुद्द राज ठाकरे यांनीही बुधवारी फेसबुकवर पोस्ट टाकत हा मोर्चा केवळ मनसेचा नसून, सर्वसामान्यांच्या लढ्यासाठी असल्याचे स्पष्टीकरण दिलं.
LIVE UPDATES
- किड्या-मुंग्यांसारखी माणसं मरतायत आणि यांच्या उच्चस्तरीय बैठका काय करायच्या? : राज ठाकरे- इतक्या वर्षांचे प्रलंबित प्रश्न आजही सुटत नाहीत. आधीच्या सरकारमध्ये जी परिस्थिती तीच आजच्या सरकारमध्ये. त्यामुळे हा संताप आहे. ज्याच्यावर कधी विश्वास टाकला नाही त्यांनी घात केला तर वाईट वाटत नाही. पण ज्यावर विश्वास टाकला तेच घात करतायत. म्हणून मोदींवर राग. या देशाने इतक प्रेम दिलं, विश्वास टाकला त्यांच्यासाठी काय करताय.? - राज ठाकरे
- 15 दिवसांच्या आत मध्य-पश्चिम रेल्वे स्टेशन पुलावरील फेरीवाल्यांना उठवलं पाहिजे, रेल्वे प्रशासनाकडे राज ठाकरेंची मागणी- 15 दिवसांत फेरीवाले उठवले गेले नाहीत, तर माझा पक्ष फेरीवाल्यांविरोधात रस्त्यावर उतरेल - राज ठाकरे- फेरीवाल्यांविरोधात होणा-या संघर्षात जे काही घडले त्याला, रेल्वे प्रशासन जबाबदार असेल - राज ठाकरे
राज ठाकरे चर्चगेट येथिल पश्चिम रेल्वे मुख्यालयात पोहोचले. मध्य-पश्चिम रेल्वेच्या जीएमसोबत बैठक, प्रवासी संघटना आणि मनसेचे पदाधिकाऱ्यांचा शिष्ठमंडळात समावेश.
मनसेचा मोर्चा चर्चगेट स्टेशनवर पोहोचला.
मनसेच्या संताप मोर्चाला सुरुवात
राज ठाकरेंची पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे मेट्रो सिनेमाकडे रवाना
हा मोर्चा सर्वसामान्यांसाठी, यामध्ये राजकारण नाही, भाजपाने आम्हाला राजकारण शिकवू नये : संदीप देशपांडे
राज ठाकरे यांच्या मोर्चाला मराठी सेलिब्रिटींचाही पाठिंबा, सिद्धार्थ जाधव, जितेंद्र जोशीसह दिग्गज कलाकांरांचं मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन
मेट्रो चित्रपटगृहाजवळ मनसे कार्यकर्त्यांची गर्दी जमायला सुरुवात
मनसैनिकांची सरकारविरोधात घोषणाबाजी
"या दडपशाहीला आम्ही भिक घालणार नाही; परवानगी नसली तरी #संतापमोर्चा निघणार म्हणजे निघणारच सरकारला काय करायचं ते करू द्या." - सरचिटणीस सौ. शालिनी ठाकरे
पोलीस यंत्रणादेखील सज्ज झाली, पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे
मेट्रो परिसरात पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात, प्रचंड गर्दीमुळे सर्वसामान्यं संतापले. पुन्हा चेंगराचेंगरीचा प्रकार घडवायचा आहे का? नागरिकांचा संतप्त सवाल
काय लिहिलं आहे पोस्टमध्ये - - एलफिन्स्टन चेंगराचेंगरीत लोक मरण पावली कारण रेल्वे प्रशासनानं आणि सरकारनं लोकांच्या साध्या सुविधांचादेखील आजपर्यंत विचार केला नाही. आपल्याला याचा धिक्कार केलाच पाहिजे. साध्या साध्या गोष्टी सुद्धा सरकार लोकांना देऊ शकत नसेल तर या सरकारचा काय उपयोग ? सरकार आणि माणसं बदलून परिस्थिती सुस्थितीत येत नसते, त्यासाठी सरकारमधील माणसांच्या जिवंत असाव्या लागतात. अनेक जण या मोर्चाकडे राजकारण म्हणून पहातीस. नमो रुग्ण तर तसेच पाहतात. त्यांचे सोडा.- मोर्चा जरी आम्ही आयोजित करत असतो तरी हा पक्षाचा मोर्चा नाही, जनतेचा आहे.- किती दिवस तुम्ही तमाशा बघत राहणार ? जाहिरातबाजीचा तमाशा, नवनव्या घोषणा करुन धूळफेकीचा तमाशा. योगाचा तमाशा, स्वच्छ भारताचा तमाशा. मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडियाचा तमाशा. - आज एक अघोषित आणीबाणी आहे. तिच्याविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मेट्रो सिनेमागृहासमोरून सकाळी ११.३० वाजता सुरू होणारा मोर्चा पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयावर धडक देईल. दरम्यान, मोर्चाला कोणतेही गालबोट न लावता शिस्तीत काढण्याचे आवाहन राज यांनी केले आहे.
मोर्चात ठाणे जिल्ह्यातील 10 हजार प्रवासी होणार सहभागी
या मोर्चामध्ये ठाणे जिल्ह्यातील 10 हजार जणांचा समावेश असेल. स्वत:च्या सुरक्षित प्रवासासाठी एकत्र या. या टॅगलाइनचा आधार घेत प्रवाशांना आवाहन करण्यात येत आहे. यासंदर्भात बुधवारीही दिवसभर कृष्णकुंज येथे प्रवासी संघटनांचे निवडक पदाधिकारी, मनसेचे नेते, पक्षाच्या रेल कामगार सेनेचे नेते आदींची सखोल चर्चा झाली. कोणकोणत्या मागण्यांचा रेटा लावावा यासाठी आधी कृष्णकुंज नंतर राजगड येथिल पक्षाच्या कार्यालयात बैठका झाल्या. मध्य-पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना देण्यात येणारे विस्तृत निवेदन, त्यातील मागण्या आदींचा त्यात समावेश होता. मोर्चानंतर महाव्यवस्थापकांकडे चर्चेला जाणारे शिष्ठमंडळात कुणाकुणाचा समावेश करण्यात यावा यावरही चर्चा झाली.
ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहरातून ७५ बसेसच्या माध्यमाने साडेतीन हजार नागरिक त्या ठिकाणी जावे असा प्रयत्न असेल. डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर आदी ठिकाणांवरुन तीन हजार तर भिवंडी, शहापूर आदी भागांमधून दोन हजार नागरिक त्या मोर्चात सहभागी होतील, असा विश्वास पक्षाचे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी व्यक्त केला. याखेरिज प्रवासी संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे देखिल सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. कल्याण-डोंबिबली महापालिकेतील पक्षाचे सर्व नगरसेवक, कार्यकर्ते यामोर्चासाठी आवर्जून जाणार असल्याचे सांगण्यात आले. मुंबईतील मेट्रो सिनेमाजवळ गुरुवारी सकाळी 11 वाजता सर्वांनी एकत्र जमण्यासाठी पक्षातर्फे आवाहन करण्यात आले असून सकाळी 11.30 वाजता मोर्चा निघणार असल्याचेही सांगण्यात आले. रेल्वे मोर्चात जास्तीत जास्त प्रवाशांनी सहभागी व्हावे यासाठी ठिकठिकाणी राज ठाकरेंच्या आवाहनांचे होर्डिंग्ज, बॅनर लावण्यात आले आहेत. सोशल मिडियावरील व्हॉट्सअॅप, यूट्यूब, इमेल्स यावर राज यांचे पत्र, संदेश, एव्हीज पाठवून जनजागृती करण्यात आली आहे.
असा असेल राज ठाकरे यांचा मोर्चा?- मेट्रो सिनेमागृह चौकात राज ठाकरे होणार दाखल - राज ठाकरे आल्यानंतर मोर्चाला होणार सुरुवात - महर्षी कर्वे रोड मार्गे मोर्चा होणार रवाना - चर्चगेटच्या पश्चिम रेल्वे मुख्यालयजवळ मोर्चा येईल- राज ठाकरे आणि विविध रेल्वे प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात जातील- मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची घेणार भेट - चर्चेनंतर राज ठाकरे मोर्चेकरांना संबोधित करतील