Join us

मुंबई विद्यापीठात मनसेचा राडा! सिनेट निवडणूक कारभारावरून कुलगुरुंना घेराव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 5:34 PM

दीडशे वर्षाची परंपरा असणाऱ्या विद्यापीठाने गेल्या वर्षभरापासून सिनेट निवडणुकीत गोंधळ घातला आहे असा आरोप गजानन काळे यांनी केला.

मुंबई – विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवरून विद्यार्थी संघटनांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप आहे. जाहीर झालेल्या सिनेट निवडणुका विद्यापीठाने एका रात्रीत रद्द करत पुढे ढकलल्या होत्या. त्यानंतर हे प्रकरण मुंबई हायकोर्टापर्यंत गेले. सिनेट निवडणुकीवरून मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज मुंबई विद्यापीठात राडा करत कुलगुरुंना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. कुलगुरू जर निर्णय घेण्यास सक्षम नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मनसेनं केली.

याबाबत मनविसे सरचिटणीस गजानन काळे म्हणाले की, कुठल्याही निवडणुकीत मतदार नोंदणीची सहजसोपी प्रक्रिया असते. परंतु दीडशे वर्षाची परंपरा असणाऱ्या विद्यापीठाने गेल्या वर्षभरापासून सिनेट निवडणुकीत गोंधळ घातला आहे. निवडणूक जाहीर झाली, मतदार नोंदणी झाली, त्यानंतर पुन्हा नोंदणी सुरू केली आहे. ९० हजार नोंदणी केलीय, त्यात आक्षेप नाही त्यांनाही पुर्ननोंदणी करायला लावली. आधार कार्ड, फोटो बंधनकारक होते, ते काढले गेले. अमित ठाकरेंच्या आदेशानंतर आम्ही ६ मागण्या कुलगुरूंसमोर ठेवल्या आहेत. त्यातील ३ मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला आहे. काही वेळात त्यावर लेखी पत्रक निघेल असं त्यांनी सांगितले.

तर मुंबई विद्यापीठ सध्या हत्यापीठ झालंय, जे काही निर्णय होतायेत ते रात्रीच होतायेत. विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय असं मनविसे पदाधिकारी अखिल चित्रे यांनी म्हटलं. त्याचसोबत आशिष शेलारांच्या एका पत्रावर विद्यापीठाने निवडणूक रद्द केले, ८ तारखेला कोर्टात यावर सुनावणी आहे. कुलगुरू हे स्वायत्त पद आहे. सत्ताधाऱ्यांच्या फोनवर विद्यापीठाचे निर्णय होऊ नये. जर असे केले भविष्यात कुलगुरूंच्या पुतळ्याला विदुषकाचा मास्क घालून तो जाळू असा इशाराही गजानन काळे यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिला आहे.

नेमकं काय घडलं?

सिनेट निवडणुकीत झालेल्या गोंधळाबाबत आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आक्रमक होत मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंना जाब विचारला. याप्रसंगी ठिय्या आंदोलन करत कुलगुरूंना विदूषकाची प्रतिमा भेट दिली. तसेच कुलगुरू राजीनामा द्या, राजीनामा द्या, आमच्या मागण्या मान्य झाल्याचं पाहिजेत, झाल्याचं पाहिजेत अशा आशयाच्या घोषणा देत मनविसे शिष्टमंडळाने खाली जमिनीवर बसून ठिय्या केले. यावेळी सरचिटणीस गजानन काळे, अखिल चित्रे, प्रमुख संघटक यश सरदेसाई, चेतन पेडणेकर, सुधाकर तांबोळी, संतोष गांगुर्डे उपस्थित होते.

टॅग्स :मनसेमुंबई विद्यापीठ