मुंबई - गेल्या काही काळापासून मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस विविध मुद्द्यांवरून आमने-सामने येत आहेत. दरम्यान, आज राज ठाकरे यांनी त्यांचा अयोध्या दौरा रद्द केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेमनसेला डिवचले होते. त्यानंतर आता मनसेनं राष्ट्रवादी काँग्रेसला थेट शिंगावर घेतले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर निशाणा साधत खरमरीत टोला लगावला आहे.
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेला चिमटा काढला होता. तूर्तास अयोध्या दौऱ्याचा भोंगा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या प्रश्नांवरुन लक्ष हटविण्यासाठी नवीन भोंगा कोणता लावावा यावर विचारविनिमय सुरू आहे. सविस्तर बोलूच", असं ट्विट राष्ट्रवादीनं केलं आहे. ट्विटमध्ये राष्ट्रवादीनं मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलला देखील मेन्शन केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या ट्विटवर आता मनसेकडून काय प्रतिक्रिया दिली जाणार याकडे लक्ष लागले होते.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या टीकेला मनसेनेही तितकंच खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. कुणी निंदा कुंणी वंदा आमचा फक्त जनहिताचा भोंगा. महाविकास आघाडीविरोधातला भोंगा पुण्यात लावूच. त्याचा आवाज मुजोर सत्ताधाऱ्यांना भानावर आणेल. तोपर्यंत देशाच्या माजी कृषिमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रतिकिलो पाच पैसेच भाव कसा मिळत राहील. याबाबत तुम्ही विचारविनिमय करत बसा, असा टोला मनसेनं लगावला आहे.
दरम्यान, गुढीपाडव्याच्या सभेपासून राज ठाकरे आणि मनसे हे शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. राज ठाकरेंनी शरद पवारांवर जातीपातीच्या राजकारणावरून गंभीर आरोप केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही त्याविरोधात आक्रमक प्रतिक्रिया उमटली होती.