भाजपासोबतच्या युतीवर मनसेचं पुन्हा मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 08:35 PM2020-01-14T20:35:52+5:302020-01-15T15:33:44+5:30
भाजपा आणि मनसे भविष्यात एकत्र येणार असल्याची चर्चा रंगू लागली होती.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मनसे पक्षाच्या झेंड्याचा रंग बदलणार असल्याची चर्चा सुरु असतानाच भाजपा आणि मनसे भविष्यात एकत्र येणार असल्याची चर्चा रंगू लागली होती. मात्र मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी भाजपा आणि मनसेची युती होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
बाळा नांदगावकरांनी साम या मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, मनसे भाजपासोबत युती करणार नाही. त्यामुळे आगामी काळात मनसे स्वबळावरच राजकारणात सक्रीय राहणार असल्याचे बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले आहे.
बाळा नांदगावकरांच्या राजकारणात कधीच कोणाचा कायम शत्रू किंवा मित्र नसतो या विधानामुळेच भाजपा आणि मनसेच्या युती होणाच्या चर्चेला उधाण आले होते. मध्यंतरी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाल्यामुळे भाजपा आणि मनसे आगामी काळात एकत्र येणार असल्याचे सांगण्यात येत होते. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे विचार आणि कार्यपद्धती बदलली तर भविष्यात आम्ही विचार करू असं मत देखील व्यक्त केले होते.
दरम्यान, आगामी 23 जानेवारीला मनसेचं महाअधिवेशन असून या अधिवेशनात राज ठाकरे नवी भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नागरिकत्व कायद्यावरुन राज्यात जे आंदोलन सुरु आहे, नवीन सरकारची कामगिरी या सर्व विषयावर राज ठाकरे बोलणार असल्याची शक्यत वर्तविण्यात येत आहे. तसेच राज ठाकरेंनी आतापर्यत नरेंद्र मोदींच्या धोरणावर खूप आगपाखड केली आहे. त्यामुळे अधिवेशनात आता पुन्हा भाजपा आणि महाशिवआघाडीच्या सरकारवर निशाणा साधणार हे आगामी काळातच समोर येणार आहे.