मनसेच्या राजकारणाला मिळणार हिंदुत्वाची किनार; पक्षाचा नवा भगवा झेंडा 'असा' दिसणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 09:11 AM2020-01-22T09:11:48+5:302020-01-22T09:12:49+5:30

ज्या पद्धतीन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्यामध्ये हिंदू तसेच अठरापगड जातीच्या लोकांचे सर्वसमावेशक राज्य होतं.

MNS Will taken Hindutva Politics; The new flag of the party will launch tomorrow | मनसेच्या राजकारणाला मिळणार हिंदुत्वाची किनार; पक्षाचा नवा भगवा झेंडा 'असा' दिसणार

मनसेच्या राजकारणाला मिळणार हिंदुत्वाची किनार; पक्षाचा नवा भगवा झेंडा 'असा' दिसणार

Next

मुंबई - राज्याच्या राजकारणात गेल्या २ महिन्यापासून मोठ्या प्रमाणात उलथापालथ होताना दिसत असताना मनसेदेखील नव्या रुपात लोकांसमोर येणार आहे. मनसेचं पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन उद्या मुंबईत पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर मनसेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. याच अधिवेशनात मनसे हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल करणार असल्याचं बोललं जात आहे. 

मनसेकडून सध्या वापरत असलेला झेंडा बदलून नवीन झेंडा आणणार असल्याचं सांगितलं जात आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर, फेसबुक हँडलवरुन मनसेचा झेंडा हटवण्यात आला असून फक्त पक्षाचं चिन्ह इंजिन वापरण्यात आलं आहे. एबीपी माझाने दिलेल्या माहितीनुसार मनसेचा नवीन प्रस्तावित झेंडा निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला असून त्याला मान्यताही मिळाल्याची माहिती आहे. 

Image result for mns new flag

मनसेचा नवीन झेंड्यामध्ये संपूर्ण भगवा रंग वापरण्यात आला असून त्यात मध्यभागी शिवमुद्रा तर दुसऱ्या झेंड्यांच्या मध्यभागी पक्षाचं निवडणूक चिन्ह रेल्वे इंजिन दाखविण्यात आलं आहे. या चिन्हाच्या खाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा उल्लेख करण्यात आला आहे. निवडणुकीसाठी मनसेकडून पक्षाचं चिन्ह असलेला झेंडा वापरण्यात येणार असून मागील काळात राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे शिवमुद्रा असलेला झेंडा शिवजयंती, महाराष्ट्र दिन व अन्य मराठी सणांमध्ये वापरण्यात येणार असल्याचं कळतंय. 

मनसेचा पूर्वीचा झेंडा चार रंगाचा होता. निळा, भगवा, हिरवा आणि पांढरा अशा रंगातील झेंडा मनसेकडून वापरण्यात येत होता. २००६ मध्ये मनसे पक्षाच्या स्थापनेवेळी राज ठाकरेंनी या झेंड्याचे अनावरण केलं होतं. त्यावेळी राज यांनी झेंड्याबाबत आपली भूमिका मांडली होती. मात्र गेल्या काही वर्षात मनसेच्या पदरी अपयश येत असल्याने मनसेने आपल्या धोरणांमध्ये बदल करण्याच ठरवलं आहे. राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर मनसेनेदेखील आपल्या धोरणांमध्ये परिवर्तन करणार आहे. अधिवेशनासाठी मनसेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये विचार महाराष्ट्र धर्माचा निर्धार हिंदवी स्वराज्याचा अशी टॅगलाईन देऊन हिंदुत्वाची दिशेने राजकारण करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. 

ज्या पद्धतीन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्यामध्ये हिंदू तसेच अठरापगड जातीच्या लोकांचे सर्वसमावेशक राज्य होतं. मनसेदेखील अशाप्रकारे हिंदवी स्वराज्याचा अजेंडा पुढे घेऊन जाताना आगामी काळात पाहायला मिळणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारीला मुंबईत मनसेचं अधिवेशन पार पडत आहे. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी जुळवून सत्ता मिळवल्याने अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते दुखावल्याचं बोललं जातं याच कार्यकर्त्यांना साद घालण्यासाठी मनसे पुढे सरसावली आहे. उद्या होणाऱ्या या अधिवेशनात मनसेचा अधिकृत झेंड्याची घोषणा होणार आहे. 
 

Web Title: MNS Will taken Hindutva Politics; The new flag of the party will launch tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.