मुंबई : फेरीवाला आणि मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा राडेबाजीला सुरुवात झाली आहे. विक्रोळी येथे काँग्रेस समर्थकांनी मनसे कार्यकर्त्यांना रविवारी रात्री जबर मारहाण केली. यावर ‘मनसेच्या गुंडांनी मार खाल्ला असून, यापुढे त्यांनी गुंडगिरी सोडून द्यावी,’ अशा शब्दांत मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी मनसेला डिवचण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर मनसे कार्यकर्त्यांनी निरुपम यांना जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिल्याने येत्या काळात हा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत. महिनाभरापूर्वी मालाडमध्ये मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांनी हल्ला केला होता.मराठी पाट्या लावाव्यात, यासाठी मनसेचे पदाधिकारी रविवारी दुपारी विक्रोळीतील दुकानमालकांना निवेदन देत होते. त्या वेळी काही दुकानदार व काँग्रेस कार्यकर्ता अब्दुल अन्सारी याच्यासह त्याच्या समर्थकांनी त्यांना मारहाण केली. यात मनसेचे पदाधिकारी विश्वजीत ढोलम व इतर चार जण जखमी झाले. मारहाणीच्या घटनेनंतर संजय निरुपम यांनी ट्विट करत मनसेवर टीका केली आहे. आमचा हिंसेवर विश्वास नाही; पण गरीब फेरीवाल्यांच्या पोटावर मनसेच्या गुंडांनी लाथ मारली तर प्रतिक्रिया उमटेलच. त्यामुळे मनसेने गुंडगिरी सोडून द्यावी, असे ट्विट निरुपम यांनी केले.विक्रोळीतील घटनेनंतर सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेते व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. या सर्व घडामोडींवर मनसेकडून अद्याप प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, कृष्णकुंजवरील बैठकीत राज ठाकरे यांनी पदाधिकाºयांची कानउघाडणी केल्याची चर्चा आहे.
मनसे कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा मारहाण, मराठी पाट्यांच्या मुद्दा; काँग्रेस - मनसेत संघर्ष पेटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 6:14 AM