मुंबई - मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज दादर येथे फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ 'फेरीवाला सन्मान' मोर्चा आयोजित केला होता. मात्र मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना घराबाहेरच पडू दिलं नसल्याचा दावा मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केला आहे. शालिनी ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळपासूनच मनसे कार्यकर्ते संजय निरुपम यांच्या वर्सोवा लोखंडवाला सर्कलजवळील ब्रेव्हरली हिल्स अपार्टमेंटबाहेर जमले होते. दबा धरून असलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घराबाहेर पडूच दिलं नाही असं शालिनी ठाकरे यांनी सांगितलं आहे.
मनसे कार्यकर्त्यांसोबत काँग्रेसचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. अनुचित प्रकार घड़ू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वर्सोवा पोलिसांनी मनसेच्या 6 ते 7 कार्यकर्त्यांना तर काँगेसचे माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांच्यासह 15 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.
काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर संजय निरुपम यांनी ट्विटरवरुन संताप व्यक्त केला होता. माझ्या घराजवळ काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड का? कोणत्या नियमाने त्यांना ताब्यात घेतलं जातंय? जमावबंदी लागू केलीय का? असा संजय निरुपम यांनी विचारला होता.
काँग्रेसचा मोर्चा सुरु होण्याआधीच मनसे कार्यकर्त्यांनी संपवलाएल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर फेरीवाल्यांवर सुरू असलेली कारवाई आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून होणा-या मारहाणीविरोधात मुंबई काँग्रेसने फेरीवाला सन्मान मोर्चाची हाक दिली. फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं दादरमध्ये आज मोर्चा आयोजित केला होता. मात्र, या मोर्चाला सुरुवात होण्याआधीच मनसे कार्यकर्ते काँग्रेस कार्यकर्त्यासोबत भिडले. मोर्चादरम्यान दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. मात्र यामुळे काँग्रेसचा मोर्चा सुरु होण्याआधीच आटोपला.
सुशांत माळवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला मालाड पश्चिम मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. फेरीवाल्यांनी रॉडने सुशांत माळवदे यांच्यावर हल्ला केला. मालाड रेल्वे स्थानकाजवळ दुपारी 3.30 वाजता हा हल्ला झाला. हल्ल्यात सुशांत माळवदे गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन सुशांत माळवदे यांची भेट घेतली होती. सुशांत माळवदे मारहाण प्रकरणी 7 फेरीवाल्यांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.
संजय निरुपम यांच्याकडून समर्थनहल्ला होण्याच्या काही वेळापुर्वी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांची सभा मालाडमध्ये पार पडली होती. त्यांनी फेरीवाल्यांशी संवाद साधला होता. संजय निरुपम यांनी चेतावल्यामुळेच फेरीवाल्यांनी हल्ला केल्याचा आरोप मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी केला होता. याचे गंभीर परिणाम मुंबईभर पहायला मिळतील असा इशारा संदीप देशपांडे यांनी संजय निरुपम यांना दिला होता. दुसरीकडे संजय निरुपम यांनी मनसेचे कार्यकर्ते हफ्ता मागत होते, त्यांच्यामुळेच फेरीवाल्यांनी हल्ला केला असं सांगत समर्थन केलं. विनापरवागी सभा घेऊन लोकांना कायदा हातात घेण्याचं आवाहन करणाऱ्या मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी निरुपम यांच्या भडकाऊ भाषणाचं व्हिडीओ रेकॉर्डिंगही केलं आहे.