Join us

VIDEO: राज ठाकरेंच्या आदेशानंतर हनुमान चालिसा सुरू; मनसेच्या कार्यालयावर लाऊडस्पीकर लागला 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2022 2:45 PM

घाटकोपर येथील मनसेच्या कार्यालयावर लाऊडस्पीकर लावला; हनुमान चालिसा सुरू

मुंबई: मशिदींवरील बेकायदा भोंगे उतरवा, अन्यथा आम्ही हनुमान चालिसा लाऊ असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी कालच्या सभेत दिला. त्यानंतर घाटकोपरमधील मनसैनिकांनी पक्षाच्या कार्यालयावर लाऊड स्पीकर लावून हनुमान चालिसा सुरू केला आहे. दिवसभर हनुमान चालिसा सुरुच राहणार असल्याचं मनसेकडून सांगण्यात आलं आहे. रमजानचा महिना सुरू असताना मनसेनं हनुमान चालिसा सुरू केल्यानं राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे.

घाटकोपर पश्चिमेकडील चांदिवलीतल्या मनसेच्या कार्यालयावर लाऊडस्पीकर सुरू करून हनुमान चालिसा सुरू करण्यात आला आहे. मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या नेतृत्वात लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा सुरू करण्यात आला आहे. जर अजानमुळे धार्मिक तेढ निर्माण होत नाही, तर हनुमान चालिसा सुरू केल्याने वातावरण कसं काय बिघडू शकतं? असा सवाल मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

मनसेचा कार्यकर्ता म्हणून राज ठाकरेंच्या आदेशाचं पालन करणं माझं कर्तव्य आहे. त्यामुळे मी आजपासून मी लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावण्यास सुरुवात केली आहे. लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा, गायत्री मंत्र, गणपतीच्या आरत्यांसह हिंदू धर्माशी निगडीत सर्व आरत्या वाजवल्या जाणार आहेत, असं भानुशाली म्हणाले. यामुळे तणाव कसा निर्माण होऊ शकेल? हा धार्मिक कार्यक्रम आहे. त्यांची अजान होते. त्यानं तणाव निर्माण होतो का? नाही ना? मग हिंदू धर्माची आरती वाजवली तर तणाव का निर्माण होईल? ते त्यांच्या धर्माचं काम करत आहेत. आम्ही आमच्या धर्माचं काम करत आहोत., असं भानुशाली म्हणाले. 

टॅग्स :राज ठाकरेमनसे