Join us

'भावी खासदार'; उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेसाठी शालिनी ठाकरे यांच्या उमेदवारीसाठी मनसैनिक आग्रही

By मनोहर कुंभेजकर | Published: October 05, 2023 9:32 PM

वाढदिवसानिमित्त मनसे कार्यकर्त्यांनी त्यांचा 'भावी खासदार' उल्लेख असलेले झळकवले बॅनर.

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई- उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आता सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. आता उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेसाठी मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांच्या उमेदवारी साठी मनसैनिक आग्रही आहेत.दि,18 मे रोजी मातोश्रीत झालेल्या या मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकरला बळ द्या असे आदेश दिले होते.तर आता याच मतदार संघावर माजी खासदार संजय निरुपम यांनी दावा सांगितला असून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी मी स्वतः उमेदवार असेल अशी स्पष्टोक्ती संजय निरुपम यांनी लोकमतला दिली. आता उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेसाठी शालिनी ठाकरे यांच्या उमेदवारी साठी मनसैनिक आग्रही असल्याने पुढील वर्षी होणारी येथील लोकसभा निवडणूक होणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

शालिनी ठाकरे यांचा वाढदिवस काल मनसे चित्रपट सेनेच्या अंधेरी पूर्व तेली गल्ली येथील कार्यालयात झाला.दुपारी 1 पासून ते रात्री 8 पर्यंत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मनसैनिक पुरुष व महिलांनी गर्दी केली हाती.यावेळी ठाकरे यांनी  वाढदिवसाला 'भावी खासदार ' असा उल्लेख असलेला केक कापला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघाची जबाबदारी शालिनी ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे.काल त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे कार्यकर्त्यांनी त्यांचा 'भावी खासदार ' असा उल्लेख असलेले बॅनर झळकवले तसेच केक देखील बनवून आणले होते.

मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघाचे सध्याचे खासदार शिंदे गटात गेले आहेत.पक्ष बदलणार्‍या राजकीय लोकांच्या विरोधातील जनभावनेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न मनसे तर्फे करण्यात येत आहे. शालिनी ठाकरे यांच्या नावाने मतदारसंघात चुरस निर्माण होण्याची शक्यता मनसैनिकांनी लोकमतकडे व्यक्त केली.

टॅग्स :मनसे