Join us

Raj Thackeray:…अन् राज ठाकरेंनी गाडी रस्त्यामध्येच थांबवली; ठाण्याच्या सभेची उत्सुकता शिगेला पोहचली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 6:32 PM

राज ठाकरेंच्या रॅलीत भगव्या झेंड्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहेत.

मुंबई – गुढी पाडवा मेळाव्यानंतर मनसे(MNS) अध्यक्ष राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्याबाबत आक्रमक विधान केले होते. सरकारने भोंगे हटवले नाहीत तर भोंग्याच्या समोर दुपटीने हनुमान चालिसा लावू असं विधान राज ठाकरेंनी केले होते. या विधानानंतर मुस्लीम पदाधिकाऱ्यांसह अनेकांनी नाराजी व्यक्त केली. राज ठाकरेंच्या भाषणावर सत्ताधारी पक्षानेही तोंडसुख घेतले होते.

विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी राज ठाकरेंनी ठाण्यात उत्तर सभेचे आयोजन केले. सुरुवातीला पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे(Raj Thackeray) त्यांचे म्हणणं मांडणार होते. परंतु त्यानंतर पत्रकार परिषदेऐवजी सभा घेऊन उत्तर देण्याचं राज ठाकरेंनी सांगितले. दुपारी ४ च्या सुमारास राज ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा दादर शिवतीर्थहून निघाला. राज ठाकरे यांच्या भाषणाबाबत सर्वच मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. राज ठाकरे दादरहून निघाले असताना घाटकोपर, विक्रोळी अशा ठिकठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली.

वसंत मोरेंनीच 'राज'भेटीतलं सत्य उलगडलं, स्पष्टच सांगितलं

विक्रोळी इथं कार्यकर्त्यांची गर्दी पाहता राज ठाकरे यांनी गाडी थांबवली आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंचे स्वागत केले. त्यानंतर दुचाकी, चारचाकी असा राज ठाकरेंच्या गाडीचा ताफा ठाण्याच्या दिशेने रवाना झाला. राज ठाकरेंच्या रॅलीत मोठ्या संख्येने तरूण सहभागी झाल्याचं दिसून आले. राज ठाकरे ठाण्यात पोहचण्याआधीच मुलुंड चेकनाक्याला ठाण्यातील कार्यकर्ते त्यांचे स्वागत करणार असून त्याठिकाणाहून १ हजार दुचाकी राज ठाकरेंना सभास्थळी घेऊन जाणार आहेत. राज ठाकरेंच्या रॅलीत भगव्या झेंड्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहेत.

घरचं लग्नकार्य सोडून वसंत मोरे ठाण्याला; राज ठाकरेंच्या सभेला हजर

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज ठाकरेंवर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यालाच उत्तर देण्यासाठी मनसेकडून या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्यामुळे हिंदू-मुस्लीम यांच्यात दंगल होऊ शकते. त्यामुळे दोन धर्मात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य करू नये असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आवाहन केले आहे. मशिदीवरील भोंग्यावरून जो संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये आणि लोकांमध्ये निर्माण झाला होता त्यावर राज ठाकरे काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

टॅग्स :मनसेराज ठाकरे