मनसेत राजीनामा नाट्य
By admin | Published: June 13, 2014 01:35 AM2014-06-13T01:35:53+5:302014-06-13T01:35:53+5:30
लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर नवी मुंबई मनसेत राजीनामा नाट्याने वेग घेतला आहे
नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर नवी मुंबई मनसेत राजीनामा नाट्याने वेग घेतला आहे. मनसेचे विद्यमान शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या कार्यपध्दतीवर पक्षात कमालीची नाराजी असल्याने पक्षात मोठ्याप्रमाणात गळती सुरु झाली आहे. काळे यांचे खंदे समर्थक तथा मनसेचे शहर सचिव कौस्तुभ मोरे यांच्यासह दहा ते बारा पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी घेतलेले काही निर्णय अयोग्य वाटल्याने आपण राजीनामा देत असल्याचे मोरे यांनी सांगीतले. तर केवळ काळे हे नेतृत्व करत असलेल्या कार्यकारिणीचाच आपण राजीनामा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मोरे यांच्यासह दोन उपविभाग अध्यक्ष, चार शाखा अध्यक्ष, उपशाखा अध्यक्ष, विभाग अध्यक्ष अशा अनेकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. कौस्तुभ मोरे यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे लोकसभा जिल्हा अध्यक्ष पद देखील आहे. परंतु पक्षनिष्ठेमुळे आपण ह्या पदावर सक्रिय राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर मंदार मोरे यांनी आपल्या विभाग अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे काळे यांच्या नेतृत्वावर पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे स्पष्ट झाले होते. आता कौस्तुभ मोरे यांनी देखिल आपल्या पदाचा राजीनामा देवुन काळे यांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीत काळे यांनी काही निर्णय स्थानिक स्तरावर घेतले होते. परंतु हे निर्णय चुकीचे असल्याने आपण त्याबाबतची विचारपूस केली. मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नाही. तसेच पक्षात कोणतेही पद नसलेल्या व्यक्तिकडून पक्ष कार्यालयातून दिले जाणारे आदेश कार्यकर्त्यांना अमान्य होते. या सर्व परिस्थितीमुळे पक्ष नेतृत्वाच्या विरोधात नाराजी सुरू आहे. काही महिन्यापूर्वी मनसेचे माजी पदाधिकारी किशोर शेवाळे यांनी शहर अध्यक्षांच्या कार्यपध्दतीवर टीका करीत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आता काळे यांचे खंदे समर्थक म्हणून परिचित असलेले मोरे यांच्यासह दहा ते बारा प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. येत्या काळात आणखी काही पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. दरम्यान, यासंदर्भात शहराध्यक्ष गजानन काळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)