मुंबई : भारतीय रेल्वेमध्ये खासगीकरणाचा वेग वाढला आहे. यामध्ये आणखीन पुढचे पाऊल म्हणून रेल्वे मंत्रालयाने १०९ मार्गावर १५१ आधुनिक ट्रेनद्वारे प्रवासी गाड्या चालविण्यासाठी खासगी कंपन्यांकडे अर्ज मागविला आहे. यातून रेल्वे विकायला सुरुवात केली जात आहे. भारतीय रेल्वेचे रूळ, रेल्वे कर्मचारी वर्ग वापरून खासगी ट्रेन चालविण्यात येत आहेत. यापुढे यामध्ये वाढ केली जाणार आहे. याविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.
रेल्वे मंत्रालय आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉपोर्रेशन (आयआरसीटीसी) यांच्यावतीने देशातील पहिली खासगी ट्रेन लखनऊ ते दिल्ली तेजस एक्सप्रेस धावली. त्यानंतर देशभरात खासगी ट्रेन सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्रालय आणि आयआरसीटीसीने वेग धरला. यासह आता खासगी क्षेत्रातून सुमारे ३० हजार कोटींची गुंतवणूक रेल्वेमध्ये केली जाणार आहे. यातूनच भारतीय रेल्वेच्या १०९ मार्गावर १५१ ट्रेन धावण्याची योजना केली आहे.
--------------
मनसे स्टाईलने ट्रॅकवर ऊतरू
रेल्वेच्या खासगीकरण निर्णयाचा विरोध करत आहे. रेल्वे खासगीकरण रोखले पाहिजे. अन्यथा मनसे स्टाईलने ट्रॅकवर ऊतरून सर्व कामगार संघटना,प्रवासी संघटना सोबत घेऊन आंदोलन केले जाईल. देशाची रेल्वे खासगी कंपन्यांना विकू देणार नाही. रेल्वे कर्मचारी आणि प्रवासी यांना खासगीकरणाचा सर्वाधिक फटका बसणार आहे. यामध्ये सरकार आणि ठेकेदार यांचे साटेलोटे आहे. त्यांनी नवा धंदा सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन देत आहे. मात्र खासगीकरण करून सरकारी नोकऱ्या गिळंकृत करत आहेत.
- जितेंद्र पाटील, अध्यक्ष, नवनिर्माण रेल्वे कामगार सेना
-------------
विकास कोणाचा होणार आहे
कोरोनाच्या महामारीच्या काळात रेल्वे प्रशासन चुकीचे धोरण राबवत आहे. लॉकडाऊनमुळे रेल्वेच्या या धोरणाचा विरोध करणे शक्य होत नाही. मात्र रेल्वेने अशाप्रकारची निर्णय घेणे थांबविले नाही, तर संघटनेच्यावतीने जोरदार आंदोलन करण्यात येईल. रेल्वेचा कर्मचारी वर्ग, रेल्वेचे रूळ वापरून ट्रेन चालविणार आहे. त्यामुळे खासगीकारणांचा मूळ उद्देश काय आहे. खासगी कंत्राटवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यापासून पगार झाला नाही. मग खासगी ट्रेनमधील कर्मचाऱ्यांना पगार योग्य आणि उचित पगार मिळेल, याची शाश्वती कोण देणार आहे. विकास करण्याची भाषा केली जाते, मात्र कोणाचा विकास केला जाणार आहे.
- अमित भटनागर, उपाध्यक्ष, सेन्ट्रल रेल्वे मजदूर संघ