मुंबई - मनसेप्रमुखराज ठाकरे यांची गेल्या काही दिवसांत भाजपसोबत चांगलीच जवळीक वाढली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी नुकतेच राज यांची त्यांच्या शिवतिर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही त्यांच्या पत्नीसह राज ठाकरेंच्या भेटीला गेले होते. गणेशोत्सव काळात अनेक दिग्गजांनी त्यांची भेट घेतली. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही राजदरबारी गेले होते. त्यावरुन, महाविकास आघाडीचे नेते राज ठाकरेंवर टिका करत आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही राज ठाकरेंवर टिका केली. आता, मनसेकडून या टिकेला प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
आटा कीलोमध्ये मिळते की लिटरमध्ये याचे भान नसलेल्या राहुल बाबांचं प्रबोधन करण्याऐवजी बाळासाहेब थोरात हे राज ठाकरे यांना सल्ले देत सुटले आहेत. जुने-जाणते नेते राहुल बाबांच्या नेतृत्वाला कंटाळुन पक्ष सोडुन राहिले आहेत. फक्त सुरक्षा रकक्षांचे ऐकले जाते असे आरोप राहुल बाबांवर होत आहेत. त्या सुरक्षा रकक्षांचे ऐकताना बाळासाहेब थोरात यांचे ऐकले जात नाही, असे म्हणत मनसेचे नेते गजानन काळे यांनी काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांवर टिका केली आहे.
थोरात यांनी त्यांच्या नेत्यांना सल्ले देण्याऐवजी आता मनसे प्रमुख राज ठाकरेंना सल्ले देत आहेत. थोरात यांच्या सल्ल्यांची राज ठाकरे आणि मनसेला गरज नाही. आपण आपला पक्ष सांभाळावा. जे लोक आपल्या पक्षातुन जात आहेत त्यांची काळजी केलीत मनसेपेक्षा, तर ते आपल्या सोयीसाठी जास्त चांगले, असा टोलाही काळे यांनी लगावला आहे.
राज ठाकरेंमध्ये लढाऊ बाणा राहिला नाही
"मनसे आणि शिंदे सेना एकत्र येतीलही शेवटी आता असं आहे की राज ठाकरे पूर्वी जे होते तसे राहिलेले नाहीत. खरे राज ठाकरे आम्ही त्यावेळी पाहिले होते. पण आता राज ठाकरेंमध्ये लढाऊबाणा राहिलेला नाही", असं बाळासाहेब थोरात म्हणाले. त्यांनी यावेळी भाजपावरही जोरदार निशाणा साधला. भाजपाला काहीही करा पण सत्ता हवी हेच त्यांचं धोरण झालं असल्याचं थोरात म्हणाले.