वरळीत उमेदवार देण्याचा मनसेचा निर्णय; आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले, मला वाटलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 08:23 PM2024-08-05T20:23:01+5:302024-08-05T20:24:46+5:30

आदित्य ठाकरे यांच्याविरोधात संदीप देशपांडे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी मनसेकडून सुरू आहे.

MNSs decision to give candidate in Worli seat shiv sena Aditya Thackeray first reaction | वरळीत उमेदवार देण्याचा मनसेचा निर्णय; आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले, मला वाटलं...

वरळीत उमेदवार देण्याचा मनसेचा निर्णय; आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले, मला वाटलं...

Aditya Thackeray ( Marathi News ) :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वबळाचा नारा देत राज्यभर मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. मनसेनं या निवडणुकीत आघाडी घेत आज आपले दोन उमेदवारही जाहीर करून टाकले असून शिवडी विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर तर पंढरपुरातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसंच वरळीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरोधात संदीप देशपांडे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी मनसेकडून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी मनसेवर सडकून टीका केली आहे.

"पाच वर्ष झोपल्यानंतर पुन्हा एकदा निवडणुकीच्या तोंडावर हा पक्ष जागा झाला आहे. त्यांचे दौरे सुरू होतात, महाराष्ट्र पिंजून काढला जाईल, असं सांगितलं जातं. मात्र तो सुपारी पक्ष आहे, तो पक्ष त्यांचं काम करेल, आम्ही आमचं जनतेची सेवा करण्याचं काम करू. पाच वर्षात राज्यात कोव्हिड असताना किंवा इतर काही प्रश्न असताना हा पक्ष दिसलाही नव्हता. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे फार लक्ष देत नाही. सुपारी पक्ष आहे तिथेच राहील," असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

दरम्यान, संदीप देशपांडे यांना तुमच्याविरोधात उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे, असं पत्रकारांनी सांगताच "मला वाटलं बायडन येत आहेत" असा मिश्किल टोलाही आदित्य यांनी लगावला आहे.

वरळीत कशी सुरूय मनसेची तयारी?

राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. अशातच विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मनसेने संदीप देशपांडे यांना रिंगणात उतरविण्याची तयारी सुरू केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेने वरळीत उमेदवार दिला नव्हता. मात्र आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार उभा करणार असल्याचे म्हटलं आहे.
 
लोकसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातून मताधिक्य कमी झाल्यानंतर मनसेने तिथे उमेदवार देण्याचं ठरवलं होतं. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात मनसेने प्रभावीपणे प्रचार सुरु केला आहे. आदित्य ठाकरेंविरोधात संदीप देशपांडे यांना मनसेकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याचे म्हटलं जात आहे. अशातच सोलापुरात बोलताना राज ठाकरे यांनी वरळी मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ठाकरे गट विरुद्ध मनसे असा तगडा सामना या मतदारसंघात रंगण्याची शक्यता आहे.
 

Web Title: MNSs decision to give candidate in Worli seat shiv sena Aditya Thackeray first reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.