मनसेच्या मतांवर आघाडीचा डोळा; मराठी मते खेचण्यासाठी नेत्यांचे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 02:15 AM2019-03-27T02:15:01+5:302019-03-27T02:15:20+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात मतदान करण्याची भूमिका जाहीर केली आहे.
- गौरीशंकर घाळे
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात मतदान करण्याची भूमिका जाहीर केली आहे. याचाच फायदा उचलत मनसेकडील मराठी मते आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांकडून सुरू आहे. विशेषत: मुंबई, नाशिक, पुणे व काही प्रमाणात औरंगाबाद येथील मनसेची मते वळावित, यासाठी आघाडीचे नेते प्रयत्नशील आहेत.
राजकीय संख्याबळाचा विचार केला तर सध्या मनसेकडे एकही आमदार, खासदार नाही. परंतु, राज ठाकरे यांना मानणारा वर्ग आहे. शिवाय, काही मतदारसंघांमध्ये मनसेची हक्काची मते आहेत. ही मते आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेस आघाडीचे उमेदवार प्रयत्नशील आहेत. स्वत: राज ठाकरे यांनी भाजपाविरोधात मतदान करण्याचे आवाहन केले आहे. शिवाय, भाजपाविरोधात मनसैनिकांना सक्रिय होण्याचे आदेशही दिले आहेत. त्यामुळे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मनसेची मते मिळावीत, असा आघाडीचा प्रयत्न असणार आहे.
निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपाची युती झाली असली तरी चार वर्षे हे दोन्ही पक्ष भांडत होते. शिवसेनेने सातत्याने भाजपा, मोदी आणि शहा यांना लक्ष्य करण्याचे धोरण ठेवले होते. मोदी, शहा जोडगोळीमुळे मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातकडे गेले. या जोडगोळीने महाराष्ट्रावर अन्याय केल्याची भूमिका शिवसेनेने सातत्याने लावूून धरली होती. शिवाय, मुंबईतील मराठी विरुद्ध गुजराती अस्मितेच्या सुप्त संघर्षाला २०१४ नंतर धार आल्याची भावना तयार झाली आहे. लोकांचा भाजपाला विरोध नाही मात्र मोदी, शहा जोडगोळीवर राग असल्याचा दावा काँग्रेसकडून केला जात आहे. मराठी मतांमध्ये फूट पडल्यास २००९ चा परिणाम साधता येईल. २००९ साली मनसे उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर मते खेचल्याने मुंबईतील सहाही मतदारसंघांत भाजपा-शिवसेना उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला होता.
मतदारसंघ उमेदवार मते टक्केवारी
उत्तर पश्चिम मुंबई महेश मांजरेकर ६६,०८८ ७.५
दक्षिण मध्य मुंबई आदित्य शिरोडकर ७३,०९६ ९.६
दक्षिण मुंबई बाळा नांदगावकर ८४,७७३ ११
भिवंडी सुरेश म्हात्रे ९४,६४७ १०.८
कल्याण प्रमोद पाटील १,२२,३४९ १५
नाशिक प्रदीप पवार ६३,०५० ६.८
पुणे दीपक पायगुडे ९३,५०२ ९.५
शिरूर अशोक खंडेभरड ३६,४४८ ३.४
ठाणे अभिजित पानसे ४८,८६३ ४.७
यवतमाळ राजू पाटील २६,१९४ २.६