शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी रक्कम देऊ केली, मनसेचे नगरसेवक संजय तुर्डेंची एसीबीकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2017 12:43 PM2017-10-19T12:43:22+5:302017-10-19T13:00:20+5:30
मनसेचे मुंबईतील एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यासाठी रक्कम देऊ केल्याचा दावा कर संजय तुर्डे यांनी तक्रार दाखल केली आहे.
मुंबई : मनसेचे मुंबईतील एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी रक्कम देऊ केल्याचा दावा कर संजय तुर्डे यांनी तक्रार दाखल केली आहे. संजय तुर्डे हे कुर्ल्यातील वॉर्ड क्रमांक 166 चे नगरसेवक आहेत. 'एबीपी माझा'नं दिलेल्या वृत्तानुसार, लाचलुचपत विभागाला पत्र लिहून तुर्डेंनी याबाबतची माहिती दिली आहे. मुंबई महापालिकेत मनसेची साथ न सोडलेले एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांनी आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी प्रामाणिक असल्याची प्रतिक्रिया दिली होती. शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक दिलीप लांडे यांनी मला शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. भविष्यासाठी हा चांगला पर्याय असल्याचं लांडेंनी सांगितले, असं संजय तुर्डे म्हणाले होते. गेल्या आठवड्यात मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
मुंबई महापालिकेतील मनसेचे नगरसेवक
अर्चना भालेराव – वॉर्ड 126
अश्विनी मतेकर- वॉर्ड 156
दिलीप लांडे – वॉर्ड 163
संजय तुर्डे – वॉर्ड 166
हर्षल मोरे – वॉर्ड 189
दत्ताराम नरवणकर- वॉर्ड 197
वॉर्ड क्र. 133चे नगरसेवक परमेश्वर कदम सोडता सहाही नगरसेवक हे शिवसेनेसोबत गेले आहेत.
मनसेचे 6 नगरसेवक शिवसेनेसोबत
शिवसेनेनं मनसेच्या 6 नगरसेवकांना फोडून पक्षप्रवेश दिला आहे. मनसेच्या 7 पैकी 6 नगरसेवकांनी कोकण विभागीय आयुक्तांना त्याबाबत पत्रसुद्धा दिलं. विशेष म्हणजे राज ठाकरेंना विचारत न घेता मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे महापालिकेतील शिवसेनेचं संख्याबळ वाढलं आहे. भाजपासाठी हा मोठा धक्का समजला जातोय. शिवसेनेच्या या मास्टर स्ट्रोकमुळे भाजपासोबत मनसेलाही धक्का बसला आहे. मुंबई महापालिकेत नगरसेवक विकत घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप खासदार किरीट सोमय्या यांनी केला.
शिवसेनेचे सध्या महापालिकेत 84 नगरसेवक आहेत, तर भाजपाजवळ 83 नगरसेवकांचं संख्याबळ आहे. भांडुप पोटनिवडणुकीमुळे भाजपा नगरसेवकांच्या संख्येत एका अंकानं वाढ झाली होती. मात्र आता शिवसेनेकडे 91 नगरसेवकांचं संख्याबळ आहे. भाजपाचे खासदार किरीट सोमय्यांनी शिवसेना नगरसेवक फोडत असल्याचं सांगत निवडणूक आयोगाला पत्रसुद्धा दिलं आहे.
2017च्या महापालिका निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले आहेत. यातीलहर्षला मोरे, अश्विनी माटेकर, अर्चना भालेराव, दिलीप लांडे, दत्ताराम नरवणकर, परमेश्वर कदम या नगरसेवकांनी मनसेला सोडचिठ्ठी सेना प्रवेश केला. पक्षाच्या आदेशाविना नगरसेवकांनी निर्णय घेतला असून, एक दिवस मनसे सोडून गेलेल्या नगरसेवकांना नक्कीच पश्चात्ताप होईल, असंही मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले.