बायका बांगड्या भरतील या धास्तीने दहीहंडीचे आयोजन रद्द केल्याचा मनसेचा राम कदमांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 07:37 PM2019-08-24T19:37:09+5:302019-08-24T19:37:22+5:30
भाजपा आमदार राम कदम घाटकोपरमध्ये दरवर्षी दहिहंडी उत्सवाचं आयोजन करतात. मात्र गेल्या वर्षी राम कदम यांच्या बेताल वक्तव्यामुळे त्यांची दहीहंडी गाजली होती.
मुंबई: मुंबई प्रमाणेच ठाण्यातही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी यंदा काही बड्या मंडळांनी दहीहंडीचे आयोजन रद्द केले आहे. घाटकोपमधील मोठी हंडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दहीहंडीचे आयोजन रद्द करुन कोल्हापुर सांगली परिसरातील पुरग्रस्ताना सहायता करणार असल्याचे राम कदम यांनी सांगितले होते. यावर मनसे कार्यकर्त्यांनी लंबाड लांडगा ढोंग करतोय म्हणत, पुरग्रस्तांच्या काळजीने नाही तर, बायका बांगड्या भरतील या धास्तीने रद्द केल्याचा टोला राम कदम यांना लगावला आहे.
भाजपा आमदार राम कदम घाटकोपरमध्ये दरवर्षी दहिहंडी उत्सवाचं आयोजन करतात. मात्र गेल्या वर्षी राम कदम यांच्या बेताल वक्तव्यामुळे त्यांची दहीहंडी गाजली होती. त्यांनी या कार्यक्रमात उपस्थित तरुणांशी बोलताना वादग्रस्त विधान केलं होतं. 'एखाद्या मुलानं एखाद्या मुलीला प्रपोज केलं असेल, मात्र तिचा नकार असेल, तर त्यानं त्याच्या आई-वडिलांना घेऊन माझ्याकडे यावं. त्या मुलाच्या पालकांना मुलगी पसंत असल्यास त्या मुलीला पळवून आणण्यात मी मदत करेन. हे चुकीचं असेल तरी मी तुम्हाला 100 टक्के मदत करेन,' असे राम कदम म्हणाले होते.
— Ganesh chukkal (@GChukkal) August 24, 2019
यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका करण्यात आली होती. तसेच महिलांनी त्यांच्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली होती. विरोधकांसह सर्वसामान्यांनीदेखील राम कदम यांच्यावर तोंडसुख घेतले होते. त्यानंतर राम कदम यांनी त्यांच्या विधानाबद्दल खेद व्यक्त केला होता. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. दुखावल्या असतील तर मी खेद करतो, असे राम कदम स्पष्ट केले होते.