Join us

मनसेच्या रुपालीताईंचा प्रचार सुरू, उदयनराजेंच्या भेटीनं दौऱ्याचा शुभारंभ  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2020 7:44 PM

विधानसभा निवडणुकांवेळी मनसेने कसबा मतदार संघातून पाटील यांना उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. परंतु ऐनवेळी शहरप्रमुख अजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती.

ठळक मुद्देविधानसभा निवडणुकांवेळी मनसेने कसबा मतदार संघातून पाटील यांना उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. परंतु ऐनवेळी शहरप्रमुख अजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती.

सातारा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुणे पदवीधर मतदारसंघासाठी मनसेच्यापुणे जिल्हा महिला अध्यक्षा रुपाली पाटील यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या अगोदर मनसेने आपला महिला उमेदवार मैदानात उतरून त्यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. उमेदवारी घोषित झाल्याच्या दुसऱ्याचदिवशी रुपाली पाटील यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. भाजपा नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन चर्चा केली. 

विधानसभा निवडणुकांवेळी मनसेने कसबा मतदार संघातून पाटील यांना उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. परंतु ऐनवेळी शहरप्रमुख अजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. यावरून कार्यकर्त्यांमध्ये पक्षांतर्गत नाराजी उमटली होती. त्यानंतर, पाटील यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन पदवीधर मतदार संघात लढण्याची ईच्छा त्यांनी व्यक्त केली होती. सर्वच राजकीय पक्षांकडून पदवीधर मतदार नोंदणी जोरदार सुरू करण्यात आली आहे. मनसे या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चेत नव्हती. परंतु, शनिवारी पाटील यांची उमेदवारी घोषित करून मनसेने आव्हान निर्माण केले आहे. पदवीधरसाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. पुणे विभागाची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून उर्वरित विभागांची उमेदवारी लवकरच जाहीर केली जाणार आहे. 

खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. तसेच, ही सदिच्छा भेट असल्याचंही उदयनराजेंनी म्हटलंय. मात्र, रुपाली पाटील यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केल्याचं स्पष्ट होतंय. रुपाली पाटील यांना भाजपाच्या संग्राम देशमुख यांचं तगडं आव्हान आहे. तर, महाविकास आघाडीही एकत्रच निवडणूक लढवणार असून त्यांचा उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आला नाही. भाजपाने आज आपल्या सर्वच मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची यादी प्रसिद्ध केली आहे. 

रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या कार्यकर्तीचा सन्मान

मी मागील वर्षभरापासून पश्चिम महाराष्ट्रात काम करीत आहे. जनतेच्या प्रश्नावर आक्रमकपणे काम केल्यामुळे उमेदवारी मिळाली आहे. उमेदवारी दिल्याबद्दल मी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आभारी आहे.- ऍड. रुपाली पाटील, उमेदवार, मनसे

टॅग्स :उदयनराजे भोसलेपुणेनिवडणूकमनसे