विचारांचा वारसा परफेक्ट 'क्लिक', राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीचा फोटो शेअर करत मनसेची सूचक प्रतिक्रिया…
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 07:38 AM2022-09-02T07:38:55+5:302022-09-02T07:39:32+5:30
Raj Thackeray and Eknath Shinde: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थ येथे जात राज ठाकरेंच्या निवासस्थानी बसललेल्या गणपतीचं दर्शन घेतलं. या भेटीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत मनसे नेते अमेय खोपकर यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी असलेल्या शिंदेगट आणि भाजपाच्या नेत्यांकडून मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्या सातत्याने भेटीगाठी घेतल्या जात आहेत. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची नुकतीच भेट झाली असताना आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थ येथे जात राज ठाकरेंच्या निवासस्थानी बसललेल्या गणपतीचं दर्शन घेतलं. तसेच राज ठाकरेंची भेट घेऊन चर्चा केली. दरम्यान, या भेटीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत मनसे नेते अमेय खोपकर यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
अमेय खोपकर यांनी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मागील बाजूला प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे दिसत आहेत. या फोटोखाली खोपकर यांनी सूचक कॅप्शन दिली आहे. त्यात ते म्हणतात की, प्रबोधनकार ते बाळासाहेब ते राजसाहेब. विचारांचा वारसा परफेक्ट 'क्लिक' झालाय. 'एक' साहेब आणि 'एक'नाथ साहेब, असं म्हणत त्यांनी शिवसेनेला डिवचलं.
प्रबोधनकार ते बाळासाहेब ते राजसाहेब.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) September 1, 2022
विचारांचा वारसा परफेक्ट 'क्लिक' झालाय.
'एक' साहेब आणि 'एक'नाथ साहेब.#श्रीगणेशा#बाप्पा_मोरया#RajThackeray#SharmilaThackeray#MNSpic.twitter.com/3uO7KbVolm
दरम्यान, गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले व ठाकरे यांच्याशी जवळपास ४० मिनिटे चर्चा केली. मुंबई, ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला महत्त्व आहे. राजकीय चर्चा झाली नाही, जुन्या आठवणींना उजाळा दिला, असे स्पष्टीकरण शिंदे यांनी माध्यमांकडे दिले. शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री व शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. शिवसेनेचे सचिव आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी जाऊन शिंदे यांनी गणपतीचे दर्शन घेतले.