मनसेचा 'राज'कीय सर्जिकल स्ट्राईक, मनसैनिकांना सज्ज राहण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 11:23 AM2019-03-05T11:23:13+5:302019-03-05T11:26:06+5:30
देशात लोकसभा निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी मनसैनिक सज्ज झाले असून 9 मार्च रोजी राजकीय सर्जिकल स्ट्राईक होणार असल्याचे पोस्टर्स मुंबईत झळकत आहेत. मनसैनिकांनी या सर्जिकल स्ट्राईकसाठी तयार राहावे, असे या पोस्टर्समधून सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे 9 मार्च रोजी मनसेचा वर्धापन दिनही साजरा करण्यात येत असतो. त्यामुळे मनसेचा 'राज'कीय सर्जिकल स्ट्राईक काय असेल, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
देशात लोकसभा निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून पक्षातील गटबाजी आणि आघाडीच्या कुरघोड्या सुरू आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्यातरी तटस्थ असल्याचे दिसते. मात्र, निवडणुकांची घोषणा होताच, ते महाआघाडीत सहभागी होण्याची चर्चा रंगली आहे. कारण, वंचित बहुजन आघाडीकडून महाआघाडीत सहभागी होण्याचा कुठलाही प्रयत्न सध्यातरी दिसून येत नाही. त्यामुळे राज ठाकरेंना मनसे जवळ करून काँग्रेस-राष्ट्रवादी मतांची विभागणी टाळण्याचा प्रयत्न करेल असे दिसत आहे. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मनसेला महाआघाडीत स्थान नसल्याचे म्हटले होते. पण, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी महाआघाडीचे कवाडे सर्वांसाठी खुले असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राज यांची महाआघाडीत मनसे एंट्री होईल असे अनेकांना वाटत आहे. त्यातच, मनसैनिकांकडून मुंबईतील अनेक भागांत लावण्यात आलेले पोस्टर्स काही वेगळेच संकते देत आहेत.
9 मार्च रोजी 'राज'कीय सर्जिकल स्ट्राईकसाठी तयार राहा, असे या पोस्टर्सवर लिहिले आहे. राज ठाकरे वर्धापनदिनी काय भूमिका घेणार, मनसे किती जागा लढणार की आघाडीत सामिल होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे 9 तारखेला मिळू शकतात. त्यामुळे मनसैनिकांचा राजकीय सर्जिकल स्ट्राईक कुणाला भारी पडणार अन् या मध्ये कोणाचा बळी जाणार हे लवकरच पाहायला मिळणार आहे.