मुंबईबाहेरील एचआयव्ही रुग्णांसाठी मोबाइल एआरटी क्लिनिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:06 AM2021-03-19T04:06:50+5:302021-03-19T04:06:50+5:30

स्नेहा मोरे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मागील वर्षी लाॅकडाऊनमुळे एचआयव्ही रुग्णांच्या उपचार प्रक्रियेत वेगवेगळ्या स्वरूपाचे अडथळे आले. ...

Mobile ART clinic for HIV patients outside Mumbai | मुंबईबाहेरील एचआयव्ही रुग्णांसाठी मोबाइल एआरटी क्लिनिक

मुंबईबाहेरील एचआयव्ही रुग्णांसाठी मोबाइल एआरटी क्लिनिक

googlenewsNext

स्नेहा मोरे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मागील वर्षी लाॅकडाऊनमुळे एचआयव्ही रुग्णांच्या उपचार प्रक्रियेत वेगवेगळ्या स्वरूपाचे अडथळे आले. त्यावर मात करून मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटीने त्या-त्या स्थानिक आरोग्य-उपचार केंद्रावर रुग्णांना एचआयव्ही उपचार आणि औषध मिळण्याची तरतूद केली होती. त्यामुळे रुग्णांना उपचारांच्या मुख्य प्रवाहात ठेवणे सोपे झाले. मात्र मागील काही महिन्यांचा आढावा घेऊन शहरातील वाहतूक सेवा, लोकलच्या वेळा यांमुळे अजूनही बऱ्याच रुग्णांना एआरटी केंद्रांना भेट देणे कठीण जात असल्याचे दिसून येत आहे. यावर उपाय म्हणून मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटीने मोबाइल एआरटी क्लिनिक सुरू कऱण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटीकडे मुंबई महानगर प्रदेशातील एचआयव्ही रुग्णांचीही नोंद आहे. म्हणजेच, वसई, विरार, पालघर, नालासोपारा अशा विविध ठिकाणांहून रुग्ण शहरातील एआरटी केंद्रांवर उपचारांसाठी येतात. सध्या कोरोनाच्या स्थितीत या रुग्णांना एआरटी केंद्रावर येणे आरोग्याच्या दृष्टीने काहीसे धोक्याचे आहे, शिवाय या रुग्णांचा वा रुग्णांच्या कुटुंबीय, नातेवाइकांचा बराचसा वेळ प्रवासात जातो. परिणामी यावर मार्ग काढत आता मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटीने मोबाइल एआरटी क्लिनिक या परिसरांत जाऊन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रुग्णांच्या आरोग्यविषयक प्रगतीवर लक्ष ठेवण्यात येईल, शिवाय वैद्यकीय चाचण्या आणि औषधांचा पुरवठाही सुरळीत राहण्यास मदत होईल, अशी माहिती मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटीच्या प्रशासनाने दिली आहे.

याविषयी, मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटीच्या अतिरिक्त संचालक डॉ. श्रीकला आचार्य यांनी सांगितले, अँटिरेट्रोव्हायरल थेरपी यात सतत संशोधन होऊन जवळपास २५ प्रकारची औषधी जगात उपलब्ध आहेत. त्यामुळे जरी आजार संपूर्णपणे बरा होत नसला तरी रुग्ण ३०-३५ वर्षे सुदृढ आणि उपयुक्त आयुष्य सहज जगू शकतो.

औषध उपचारपध्दती देत असताना त्या औषधांचे दुष्परिणाम, इतर औषधांबरोबर होणारे इंटरॅक्शन, औषधांमुळे उत्पन्न होणारे रेशिस्टन्स इ. बाबींचा अभ्यास करणे गरजेचे असते. उपचार सुरू करण्यापूर्वी समुपदेशन करणे गरजेचे असते. त्याद्वारे रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीयांमध्ये सकारात्मकता येऊन स्वत: जबाबदारी वाढते. अशा रुग्णांना संतुलित आहार, नियमित व्यायाम याचे महत्त्व पटवून द्यावे लागते. त्यामुळे आता रुग्ण केंद्रांवर पोहोचत नसल्याने थेट क्लिनिकच त्यांच्या दारात घेऊन जाण्याचा सोसायटीचा मानस आहे. येत्या शनिवारी वसई-विरार येथे पहिले मोबाइल एआरटी क्लिनिक सुरू कऱण्यात येणार आहे.

मोबाइल एआरटी क्लिनिकची वैशिष्ट्ये

* वैद्यकीय चाचण्या व अहवालांची प्रक्रिया होणार सुकर

* औषध पुरवठ्यातील अडथळा होणार दूर

* रुग्णांच्या दृष्टिकोनातून प्रवासाचा वेळ वाचणार

* रुग्णांच्या शारीरिक-मानसिक आरोग्याचा प्रगती आलेख पडताळता येणार

* व्हायरल लोड चाचण्या करण्यात येणार

* वैद्यकीय तज्ज्ञांचा चमू एआरटी केंद्रात कार्यरत

Web Title: Mobile ART clinic for HIV patients outside Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.