मुंबई : डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मोबाइल बँकिंगशी संबंधित संदेशवहन मोफत करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. येत्या आठ डिसेंबरपर्यंत त्यावर सूचना आणि हरकती नोंदविण्याच्या सूचना भागधारकांना करण्यात आल्या आहेत.
आर्थिक व्यवहारांत सुसूत्रता आणण्यासाठी डिजिटल व्यवहारांवर भर देण्याचे आवाहन केंद्र सरकारकडून सातत्याने केले जात आहे. मोबाइल बँकिंगशी संबंधित, मेसेज आधारित असंरचित पूरक सेवा, डेटा (यूएसएसडी) सेवा मोफत दिल्यास त्यास आणखी चालना मिळू शकते, हा विचार गेल्या काही दिवसांत समोर आला होता. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत ‘ट्राय’ने उपरोक्त प्रस्ताव सादर केला आहे.
मोबाइल बँकिंगशी संबंधित मेसेजसाठी सध्या प्रति ‘यूएसएसडी’ ५० पैसे शुल्क आकारले जाते. ट्रायने सादर केलेल्या प्रस्तावात मोबाइल बेस्ड बँकिंग आणि पेमेंट सेवेसाठी शून्य शुल्क आकारणी करण्याचे नमूद केले आहे. शिवाय मोबाइलच्या मदतीने बँक खात्यातील रक्कम तपासण्यासह तत्सम सुविधाही पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहेत.
‘यूएसएसडी’च्या आधारे मोबाइलवरून मेसेजद्वारे फंड ट्रान्स्फर आणि बॅलन्स चेकसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्यासाठी संबंधित ग्राहकाचा मोबाइल क्रमांक बँक खात्याशी संलग्न असणे गरजेचे आहे. या माध्यमातून इंटरनेटविना मोबाइल बँकिंग सेवेचा लाभ घेता येतो. फिचर फोनसाठी तयार केलेल्या या यंत्रणेचा सर्वाधिक वापर ग्रामीण भागात केला जातो. त्यामुळे ग्रामीण ग्राहकांना या निर्णयाचा मोठा दिलासा मिळणार आहे.