मुंबई : आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी मुंबईत आलेल्या उज्जैनच्या साहाय्यक प्राध्यापकाचा मोबाइल घेऊन ओला टॅक्सी चालक पसार झाल्याची घटना पायधुनीत घडली. या प्रकरणी तक्रार दाखल होताच पायधुनी पोलिसांनी शनिवारी कुलाबा येथून ओला टॅक्सी चालक शंभो मंडल याला बेड्या ठोकल्या आहेत.
मूळचे मध्य प्रदेश येथील रहिवासी असलेले डॉ. नरेंद्रसिंग भागीरथप्रसाद पटेल (३२) हे उज्जैनच्या आर.डी. मेडिकल कॉलेजमध्ये साहाय्यक प्राध्यापक आहेत. १४ ते १६ डिसेंबर रोजी चर्नी रोड येथील खासगी रुग्णालयात आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याच परिषदेसाठी सिंग त्यांची पत्नी डॉ. दीपिका यांच्यासोबत गुरुवारी विमानाने दाखल झाले. तेथून त्यांनी हॉटेलकडे जाण्यासाठी मंडल याची ओला टॅक्सी बुक केली. त्याच्या टॅक्सीने मोहम्मद अली रोड येथे उतरले. प्रवासादरम्यान त्यांनी मोबाइल टॅक्सीत चार्जिंगला लावला होता.
टॅक्सी हॉटेलजवळ थांबवून ते हॉटेलमध्ये बुकिंगच्या चौकशीसाठी गेले. त्याच दरम्यान टॅक्सी चालकाने तेथून पळ काढला. ही बाब पटेल यांच्या लक्षात येताच, त्यांनी त्यांच्यामागे धाव घेतली. मात्र चालक थांबला नाही. त्यांच्या पत्नीने चालकाला फोन करून मोबाइल परत देण्याबाबत विनंती केली. तेव्हा त्यांना अरेरावीची भाषा करत, मोबाइल नाही देणार, असे सांगून त्याने फोन कट केला.अखेर पटेल दाम्पत्याने पायधुनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला.आरोपी शंभो मंडलला कुलाब्यातून अटकआरोपीला कुलाबा परिसरातून बेड्या ठोकल्या. त्याच्या अंगझडतीतून पटेल यांचा मोबाइल पोलिसांनी ताब्यात घेतला. मंडल हा विलेपार्ले येथील रहिवासी आहे. पोलीस त्याच्याकडे अधिक तपास करत आहेत. त्याच्याविरुद्ध आणखीन काही गुन्हे नोंद आहेत का? या दिशेनेही पोलीस चौकशी करत आहेत.