मुंबई - गेल्या दोन दिवसांत मुंबई विमानतळावर पाच स्वतंत्र घटनात विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकूण ६ किलो ३३ ग्रॅम सोने जप्त केले असून याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ३ कोटी ४९ लाख रुपये आहे. विशेष म्हणजे, सोने तस्करीसाठी या तस्करांनी मोबाईल चार्जर, हेअर ड्रायर, विशिष्ट प्रकारे शिवून घेतलेले कपडे याद्वारे ही तस्करी केल्याचे उघड झाले आहे. या पाचही घटनांत अटक करण्यात आलेले आरोपी हे भारतीय नागरिक आहेत.
परदेशातून मुंबईमध्ये सोन्याच्या तस्करीचा प्रयत्न होत असल्याची विशिष्ट माहिती सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार विविध देशांतून आलेल्या पाच विमानांच्या बाहेर अधिकाऱ्यांना सापळा रचला होता. पाचही प्रवाशांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे त्यांना बाजूला घेत त्यांची चौकशी करण्यात आली.