सौरऊर्जेवर चालणारे मोबाइल चार्जिंग पॉइंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:51 AM2019-12-29T00:51:53+5:302019-12-29T00:52:41+5:30
पश्चिम रेल्वेमार्गावरील १५ स्थानकांवर सौरऊर्जेवर चालणारे मोबाइल चार्जिंग पॉइंट
मुंबई : पश्चिम रेल्वे प्रशासनाद्वारे पर्यावरणस्नेही स्थानके उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार पश्चिम रेल्वेमार्गावर पर्यावरणपूरक यंत्रणा आणण्यावर भर दिला जात आहे. पश्चिम रेल्वेमार्गावरील १५ स्थानकांवर सौरऊर्जेवर चालणारे मोबाइल चार्जिंग पॉइंट उभारण्यात आले आहेत.
प्रवाशांच्या सुविधेसाठी पश्चिम रेल्वेमार्गावरील १५ स्थानकांत २४ तास विनामूल्य चार्जिंग सेवा उपलब्ध होणार आहे. सौरऊर्जेवर चालणाऱ्या मोबाइल चार्जिंग पॉइंटमध्ये एका वेळी ८ फोन चार्जिंग करू शकतो. तर, एका दिवसात १००पेक्षा जास्त फोन चार्ज होऊ शकतात, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
पश्चिम रेल्वेमार्गावरील चर्चगेट, ग्रॅण्ट रोड, मुंबई सेंट्रल, लोअर परळ, दादर, सांताक्रुझ, अंधेरी, कांदिवली, वसई रोड, नालासोपारा, विरार, बोईसर, पालघर येथे प्रत्येकी एक मशीन बसविण्यात आली आहे. तर, बोरीवली येथे दोन मशीन बसविण्यात आल्या आहेत. यासह आणखी पाच स्थानकांवर सौरऊर्जेवर चालणारे मोबाइल चार्जिंग पॉइंट बसविण्यात येणार आहेत. सौरऊर्जेवर चालणारे मोबाइल चार्जिंग पॉइंट हे १०० टक्के सौरऊर्जेवर चालणारे आहेत. रेल्वे स्थानकाच्या छतावर सौर पॅनेल बसवले आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाºयांनी दिली.
सौरऊर्जेमुळे वाचले १ कोटी रुपये
पश्चिम रेल्वेने ‘स्वच्छभारत मोहीम’ या अंतर्गत अनेक वेगवेगळे पर्यावरणपूरक कामे केली. यामध्ये पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल स्थानकासह इतर अनेक स्थानकांवर सोलर पॅनेल उभारण्यात आले. या पॅनेलमुळे आर्थिक वर्षात एक कोटीच्या विजेच्या देयकात बचत झाली आहे.