Join us

सैन्यभरती घोटाळ्यातील आरोपींचे मोबाइल जप्त

By admin | Published: March 10, 2017 2:24 AM

सैन्य भरती घोटाळ्यातील तीन प्रमुख आरोपींचे मोबाइल फोन ठाणे पोलिसांनी जप्त केले. त्यापैकी एका आरोपीने सैन्य भरतीची प्रश्नपत्रिका फोडून ती साथीदारांना

ठाणे : सैन्य भरती घोटाळ्यातील तीन प्रमुख आरोपींचे मोबाइल फोन ठाणे पोलिसांनी जप्त केले. त्यापैकी एका आरोपीने सैन्य भरतीची प्रश्नपत्रिका फोडून ती साथीदारांना पाठविण्यासाठी वापरलेल्या मोबाइल फोनची तोडफोड करून विल्हेवाट लावल्याची माहितीही समोर आली आहे.सैन्य भरतीची प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या टोळीचा ठाणे पोलिसांनी पर्दाफाश करून, या प्रकरणी आतापर्यंत २४ आरोपींना अटक केली आहे. २६ फेब्रुवारी रोजी सैन्य भरतीची लेखी परीक्षा होणार होती. तत्पूर्वी २५ फेब्रुवारीला रात्री पोलिसांनी पुणे, नागपूर आणि गोवा येथे धाड टाकली होती. नागपूर येथील सैन्य भरती कार्यालयातील लिपीकवर्गीय कर्मचारी रवींद्रकुमार जांगु, धरमविरसिंग आणि निगमकुमार पांडे हे या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत. या आरोपींचे मोबाइल फोन्स मिळवणे तपासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे होते. परंतु सध्या पोलीस कोठडीत असलेले हे आरोपी त्यांच्या मोबाइल फोन्सची माहिती पोलिसांना देण्यास तयार नव्हते. या प्रकरणातील आणखी एक आरोपी संतोष शिंदे याने या तिन्ही आरोपींना मोबाइल फोन भेट म्हणून दिले होते. ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तपासकामी नागपूर येथे गेले होते. या पथकाने हे फोन्स मिळवले असून, त्याद्वारे महत्त्वाची माहिती मिळण्यास मदत होऊ शकते. त्याअनुषंगाने आरोपींच्या मोबाइल फोन्सची वैद्यक तपासणी (फोरेन्सिक टेस्ट) केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रश्नपत्रिका फोडण्यासाठी या फोन्सचा वापर कसा झाला, कुणा-कुणाला प्रश्नपत्रिका पाठविण्यात आल्या होत्या आदी मुद्द्यांची माहिती वैद्यक तपासणीतून मिळेल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. फेकलेला मोबाइल महत्त्वाचा२५ फेब्रुवारी रोजी रात्री ठाणे पोलिसांनी टाकलेल्या धाडीची माहिती नागपूर येथील सैन्य भरती कार्यालयातील लिपीक रवींद्रकुमार जांगु याला लगेच मिळाली होती. रवींद्रकुमारने प्रश्नपत्रिका फोडून साथीदारांना व्हॉटस्अ‍ॅपद्वारे पाठविली होती. यासाठी वापरलेला मोबाइल फोन लगेच तोडून नागपूर रेल्वे स्थानकासमोरील पुलावर फेकला होता. तसा जबाब रवींद्रकुमारने पोलिसांकडे नोंदविला आहे. नागपूर पोलिसांची मदतप्रश्नपत्रिका साथीदारांना पाठविल्यानंतर रवींद्रकुमारने फेकून दिलेला मोबाइल फोन मिळवणे पोलिसांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. रवींद्रकुमारचा गुन्ह्यातील सहभाग आणि इतर आरोपींची नावे उघड करण्यासाठी हा फोन मिळविण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे याकामी ठाणे पोलिसांनी नागपूर पोलिसांचीही मदत घेतली आहे.