- अतुल कुलकर्णी,(संपादक, लोकमत, मुंबई)
एका चिमुकल्या मुलाने यूट्युबवर व्हिडीओ पाहून स्वतःच्या बाहुलीला आधी फाशी दिली आणि नंतर स्वतःही गळफास घेतला...! ही समूळ हादरवून टाकणारी घटना आहे. रडणाऱ्या मुलांना गप्प करण्यासाठी आपण त्यांच्या हातात मोबाइल देऊन टाकतो आणि त्याला गप्प करतो. मात्र, त्याचे काही काळ गप्प होणे, त्याच्या आयुष्यावर बेतू शकते, हे सांगणारी ही घटना आहे. जे आईवडील रडणाऱ्या मुलांशी संवाद न साधता, त्याला मोबाइल देऊन गप्प करत असतील, त्यांच्यासाठी तर ही घटना अतिशय भयंकर आहे... वेळीच सावध करणारीही...!
मोबाइलचा वाढता वापर आजच्या काळात किती जीवघेणा होत चालला आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. मुलांच्या हातात दिलेल्या मोबाइलमध्ये मुलं काय पाहतात...? काय करतात...? याचीही माहिती पालक म्हणून आम्हाला नसते. मध्यंतरी पब्जी नावाचा गेम आला होता. तो गेम खेळता-खेळता अनेक मुलांनी आपले जीव गमावल्याची उदाहरणे आपल्या आवतीभोवती आहेत. माझ्या एका मित्राची मुलगी मोबाइल दिला नाही, तर प्रचंड आक्रमक होते. हाणामारी करू लागते. म्हणून तिला मानसोपचार तज्ज्ञांकडे दाखल केले आहे. मुळात आपली काही चूक आहे की नाही, हे आई-वडिलांनी स्वतःला विचारायला हवे. वाढती महागाई, छोटे चौकोनी कुटुंब, त्यात दोघेही नोकरी करणारे, अशा स्थितीत मुलांकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही.
पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आजी-आजोबा मुलांशी बोलायचे. त्यांना चार गोष्टी सांगायचे. आज ती स्थिती राहिली नाही. मोठ्या शहरांमध्ये मुलांना खेळायलाही फारसे कोणी घेऊन जात नाही. अशा वेळी त्याला गप्प करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मोबाइल. जो त्याच्या हाती दिला की, तो गप्प होतो, पण आपण आपल्या मुलाला आयुष्यभराचे गप्प करायला निघालो आहोत, याचे भानही पालकांना आहे की नाही, असा प्रश्न पडण्यासारखी भयंकर परिस्थिती आजूबाजूला आहे.
तुम्हाला सांगायला काय जातं...? आम्हाला घर चालविताना नाकीनऊ येतात. पैशांची जुळवाजुळव करताना दमछाक होते, अशी उत्तरं येऊ शकतात. मात्र, हा विचार प्रत्येकाने मूल जन्माला घालतानाच केला पाहिजे. मूल वाढविणं, मोठं करणं, ही एक अत्यंत आव्हानात्मक प्रक्रिया आहे. अनेक घरांमध्ये सुबत्ता असूनही मुलं आणि आई-बापामध्ये भांडणं होतात. वाद होतात. मुलांना काय हवं, याचा विचार कोणी करायचा? आपल्याला जे बनायचं होतं, ते बनता आलं नाही, म्हणून आपल्या मुलांनी तसं झालं पाहिजे, असे वाटणारेही अनेक पालक आहेत. अनेकदा मुलांवर काही गोष्टी लादल्या जातात. याचा विचारही व्हायला पाहिजे. अजूनही वेळ गेली नाही. मुलांशी संवाद साधा. त्यांना जवळ घेऊन बसा. त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारा. प्रेमाने समजावून सांगत, त्यांचे मोबाइलवेड कमी करा... अन्यथा...
‘हा’ प्रश्न पालकांनी स्वतःला विचारावामुलगा शाळेतून घरी आल्यानंतर आपण त्याला काय विचारतो..? दुपारचा डबा खाल्ला का? होमवर्क काय दिले आहे? सर किंवा मॅडम काय म्हणाल्या? शाळेची फी भरली का? अशा काही मोजक्या प्रश्नांव्यतिरिक्त आपण त्याच्याशी अन्य कोणत्या विषयावर बोलतो? हा प्रश्न प्रत्येक पालकाने स्वतःला विचारला पाहिजे. टीव्हीवर एखादी सीरियल सुरू असेल, तर याची कथा तुला माहिती आहे का? हे नाटक तू पाहिलेस का? या गाण्याच्या कार्यक्रमात काय वेगळेपण आहे? अमुक पुस्तक तू वाचले का? चल, आपण पुस्तक घेऊन येऊ... लायब्ररीत जाऊ किंवा बागेत फिरायला जाऊ... असा संवाद आपण साधतो का? नोकरी करण्याचे काम माझे आणि मुलांना घडविण्याचे काम बायकोचे, अशा वाटण्या करून मुले सुधारतील का...?
आईने झापायचे, वडिलांनी लाड करायचेआईने मुलांना झापायचे, परीक्षेवरून बोलायचे आणि वडिलांनी त्याचे लाड करायचे... अशाही वाटण्या काही घरांमध्ये पाहायला मिळतात. काही अंशी त्या परिणामकारक होतातही...! मात्र, सातत्याने एक जण रागावण्याची भूमिका घेऊ लागला आणि एक जण कौतुकाची, तर जो रागावणारा आहे, त्याविषयी मुलांच्या मनात काय भावना निर्माण होतात, याचाही विचार केला पाहिजे.