मोबाइल डिलिव्हरी अडकलीय सांगत गंडा; जिम ट्रेनरची १.३० लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2024 12:27 PM2024-10-11T12:27:13+5:302024-10-11T12:27:28+5:30
याप्रकरणी खार पोलिस तपास करत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : खार परिसरात राहणाऱ्या निखिल गमरे या जिम ट्रेनरला एका अनोळखी इन्स्टाग्राम आयडीवरून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करणे महागात पडले. सायबर भामट्यांनी त्याला एक लाख २९ हजार ४०४ रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी खार पोलिस तपास करत आहेत.
तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, १६ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता त्यांच्या इन्स्टाग्रामवर मोबिलेजंड्स या आयडीला फॉलो रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर त्यांनी ते पेज पाहिले. त्या पेजवर इलेक्ट्रॉनिक गॅजेट विक्रीबाबत जाहिरात दिली होती. त्यांनी त्यावरील लिंक ओपन केल्यानंतर त्यांच्या व्हॉट्सअॅपवर घड्याळ आणि फोनबाबत माहिती पाठविली. त्याची एकूण किंमत ४० हजार रुपये सांगत बैंक अकाऊंट नंबर पाठवण्यात आला.
तक्रारदाराने क्रेडिट कार्ड वापरून २० हजार बुकिंग, तर १८ हजार रुपये कन्फर्म अमाऊंट पाठवली. त्यानंतर भामट्यांनी तक्रारदाराला तुमच्या मोबाइलची डिलिव्हरी अडकली आहे, त्यामुळे तुम्हाला क्लिअरन्स रक्कम भरावी लागेल, असे सांगितले. गमरे यांनी १९,७५० रुपये दोनदा पाठवले. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांना घड्याळ घरी पाठविले. तसेच उर्वरित प्रॉडक्ट दोन दिवसांत येतील, असे सांगितले.
इन्स्टा आयडीवरून प्रतिसाद नाही
पाठपुरावा केल्यानंतर पुन्हा तुम्हाला क्लिअरन्स रक्कम भरावी लागेल, असे सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने २५,९५२ रुपये दोनदा पाठवले. मात्र त्यानंतर त्यांना सदर इन्स्टाग्राम आयडी किंवा व्हॉट्सअॅपवरून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. तेव्हा त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. अखेर गमरे यांनी ८ ऑक्टोबर रोजी सायबर हेल्पलाइन १९३० यावर तक्रार करत दुसऱ्या दिवशी खार पोलिस ठाणे गाठले.