Join us

मोबाइल गेम बनतोय करिअरचा मार्ग; आशियाई क्रीडा स्पर्धेने दिला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 8:16 AM

नुकताच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदाच ई-गेम्सचा समावेश झाला होता. यामध्ये भारतीयांनीही छाप पाडली.

रोहित नाईक -

मुंबई : दिवसभर मोबाइल किंवा कॉम्युटर गेम खेळल्याने ओरडणारे पालक आता आपल्या मुलांना या खेळांसाठी प्रोत्साहन देताना दिसत आहेत. याचे कारण म्हणजे व्हिडीओ गेम्सने करिअर घडविण्याचा दिलेला मार्ग. नुकताच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदाच ई-गेम्सचा समावेश झाला होता. यामध्ये भारतीयांनीही छाप पाडली. ‘व्हिडीओ गेम्स खेळून देशाचे प्रतिनिधित्व करतानाच पदक जिंकण्याचीही संधी मिळत असल्याने आमच्या कौशल्याचे कुटुंबीयांकडूनही कौतुक होत आहे,’ अशी प्रतिक्रिया कांदिवलीच्या जयदीप माणकर याने ‘लोकमत’कडे व्यक्त केली. 

वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये (एनएससीआय) सध्या बॅटलग्राऊंड्स मोबाइल इंडिया म्हणजेच बीजीएमआय या अत्यंत लोकप्रिय गेमची स्पर्धा सुरू आहे. देशभरातून सुमारे साडेसहा लाखाहून अधिक खेळाडूंचा सहभाग लाभलेल्या या स्पर्धेची तीनदिवसीय अंतिम फेरी सध्या मुंबईत सुरू आहे. क्राफ्टन इंडिया ई-स्पोर्ट्सच्या वतीने सुरु असलेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत चार खेळाडूंचा एक याप्रमाणे एकूण १६ संघ प्रत्येक दिवशी सहा सामने खेळतील. 

या स्पर्धेद्वारे ई-स्पोर्ट्स बाबत निर्माण झालेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न आहे. या स्पर्धेतून करिअरची अनोखी संधी मिळत आहे. शिवाय आशियाई स्पर्धेद्वारे ई-स्पोर्ट्सला अधिक प्रोत्साहन मिळत असल्याने भारतीयांसाठी एक नवीन क्षेत्र तयार होत आहे. - करण पाठक, स्पर्धा आयोजक

एकूण २ कोटींच्या रोख पारितोषिकांचा वर्षाव होणाऱ्या या स्पर्धेत विजेत्या संघाला ७५ लाख, उपविजेत्याला ३७.५ लाख, तर तिसऱ्या स्थानावरील संघाला २५ लाख रुपयांचे पारितोषिक मिळेल. याशिवाय इतर संघांनाही क्रमवारीनुसार रोख पारितोषिके मिळणार आहेत. 

या खेळाबाबत जयदीप म्हणाला की, ‘मी तीन वर्षांपासून हा खेळ खेळतोय. सुरुवातीला घरचे खूप ओरडायचे. पण, नंतर या गेमच्या स्पर्धांविषयी माहिती मिळाली आणि मी सहभागी झालो. हळूहळू यामध्ये जिंकत गेलो आणि आज राष्ट्रीय स्तरावर पोहचलो आहे. माझी वाटचाल पाहून पालकांनीही प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली.’ 

या स्पर्धेत जयदीपसह हामझा हौदराबादवाला (सांताक्रूझ), हर्ष राव (मीरारोड), शिल्प सोनी (डोंबिवली), कपिल दळवी (वाशिंद), राल्फ कार्डोझ (आग्रीपाडा) हे महामुंबईतील खेळाडू सहभागी आहेत. 

 

टॅग्स :मोबाइल