मोबाइल ग्लास कव्हर व्यवस्थित लावले नाही म्हणून हत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 02:43 AM2018-01-24T02:43:48+5:302018-01-24T02:44:37+5:30
मोबाइल ग्लास कव्हर व्यवस्थित लावले नाही, म्हणून लोखंडी रॉडने ग्राहकाने सेल्समनवर प्राणघातक हल्ला चढविल्याची घटना अंधेरीत घडली.
मुंबई : मोबाइल ग्लास कव्हर व्यवस्थित लावले नाही, म्हणून लोखंडी रॉडने ग्राहकाने सेल्समनवर प्राणघातक हल्ला चढविल्याची घटना अंधेरीत घडली. अवघ्या १०० रुपयांच्या कव्हर ग्लाससाठी करण्यात आलेल्या हल्ल्यात अमरनाथ यादव (१९) जखमी झाला आहे. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अंधेरी मेट्रो स्टेशनखाली इक्रो मोबाइल स्टोअर आहे. येथेच यादव सेल्समन म्हणून नोकरीला होता. १७ रोजी रात्री ८च्या सुमारास शैलेंद्र राजेंद्र द्विवेदी (२८) या तरुणाने त्याच्या दुकानात मोबाइलला ग्लास कव्हर लावून घेतले. मात्र, ते व्यवस्थित न लावल्याने शैलेंद्रने त्याच्यासोबत वाद घातला. याच वादात शैलेंद्रने दुकानालगत असलेल्या लोखंडी रॉडने यादववर हल्ला चढविला. घटनेची वर्दी लागताच अंधेरी पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी शैलेंद्रला ताब्यात घेत, यादवला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी अटक करण्यात आलेला शैलेंद्र हा मालाडचा रहिवासी आहे.