मोबाइलने आरोग्य बिघडवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:07 AM2021-03-06T04:07:09+5:302021-03-06T04:07:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पूर्वी मुलांना शाळा व अभ्यासातून वेळ मिळताच मुलं आधी मैदानामध्ये धाव घेत असत. मैदानात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पूर्वी मुलांना शाळा व अभ्यासातून वेळ मिळताच मुलं आधी मैदानामध्ये धाव घेत असत. मैदानात जाऊन ते मातीतील खेळ खेळत असत. मात्र अलीकडची लहान मुलं मैदानी खेळांपासून दूर जाताना दिसत आहेत. लपाछपी, खोखो, कबड्डी, क्रिकेट, विटी-दांडू अशा खेळांचे नाव हल्लीच्या मुलांसमोर उच्चारताच त्यांच्या कपाळाला आठ्या पडतात. हल्ली लहान मुलं मोबाइल गेम्सच्या अत्यंत आहारी गेल्याचे दिसून येत आहे.
दिवसातील निम्म्याहून अधिक वेळ मुलं घरात बसून मोबाइल गेम्स खेळत असतात. यामुळे त्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. तसेच शरीराची हालचाल न झाल्याने त्यांना विविध आजारदेखील उद्भवत आहेत.
* मुले कायम मोबाइलवर
हल्ली मुलांना शाळेत असल्यापासूनच पालक मोबाइल घेऊन देतात. त्यामुळे लहानपणापासूनच ते गेम्स खेळण्याच्या नादात मोबाइलमध्ये अडकून राहतात. अनेकदा घरातील लहान मूल रडू लागल्यास ते गप्प राहावे यासाठी पालकांकडून त्याच्या हातात मोबाइल दिला जातो. लहानपणापासूनच मुले मोबाइलच्या आहारी गेल्यामुळे ते मैदानी खेळांकडे पाठ फिरवितात यामुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा, लठ्ठपणा, डोळ्यांचे आजार व विविध मानसिक आजार जडतात. पालकांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सुरेश प्रधान यांनी सांगितले.
* कोरोनामुळे मोबाइल गेम खेळण्याचे प्रमाण वाढले
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वांना घरबसल्याच आपली कामे करावी लागत होती. लहान मुले घराबाहेर न पडल्यामुळे त्यांच्याकडे मोबाइल हे एकमेव मनोरंजनाचे साधन उपलब्ध होते. या काळात ऑनलाइन गेमिंग मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे मुले मोबाइलच्या आहारी गेली. त्याचप्रमाणे ऑनलाइन शिक्षण द्यावे लागल्याने काही मुलांकडे मोबाइल आला. परिणामी, मोबाइल गेम खेळण्याचे प्रमाण वाढले.
* विटी-दांडू गायब
हल्लीच्या लहान मुलांना मैदानी खेळांचा जवळपास विसर पडत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. खोखो, विटी-दांडू, कबड्डी यांसारखे अस्सल मातीतले खेळ लहान मुले खेळत नाहीत. या खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहते. त्याच प्रमाणे मुलांमध्ये लहानपणापासूनच खिलाडूवृत्तीची वाढ होते. परंतु मोबाइलच्या अतिवापरामुळे लहान मुले हे सर्व खेळ विसरून गेली आहेत.
आशिष दाते (विद्यार्थी) : घरापासून मैदान लांब असल्याने मैदानात खेळ खेळण्यासाठी नेहमी जाणे होत नाही. आम्ही सर्व मित्र मोबाइलवर ऑनलाइन गेम खेळतो. अनेकदा शिक्षक तसेच आई-वडिलांकडून याबाबतीत ओरडादेखील मिळतो. आता गेमचे प्रमाण कमी करून मैदानात खेळण्यास जायचे आहे.
चंद्रकांत पाटील (पालक) : हल्ली मैदानी खेळांच्या सोबतच मोबाइल तसेच सोशल मीडिया याबाबतीत अपडेटेड राहणे गरजेचे आहे. कोरोनामध्ये घराबाहेर न पडल्याने मैदानी खेळांचे प्रमाण कमी असले तरी हळूहळू ते प्रमाण वाढणार आहे. मी माझ्या मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी नेहमी प्रवृत्त करतो.