मुंबई : दुचाकी चालवताना वर्दळीच्या रस्त्यावर एका हातात मोबाइल आणि दुसऱ्या हाताने वाहन चालविणारे शहरात अनेक ठिकाणी दिसून येतात. यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते. वाहतूक पोलिसांनी हटकले किंवा चलनद्वारे कारवाई केल्यास दंडसुद्धा भरावा लागू शकतो. मोबाइलवर बोलत वाहन चालविणे जिवावर बेतल्यास तो शेवटचा कॉल ठरू शकतो. दुचाकी, तीनचाकी, मोटार वाहन आणि अन्य वाहने अशा कोणत्याही प्रकारांमध्ये वाहन चालविताना मोबाइलचा वापर केल्यास पहिल्यांदा नियम मोडला तर एक हजार रुपयांचा दंड आकारला जातो.
...तर जबर दंड
गेल्या वर्षभरात वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी कार्यरत राहून नियम मोडणाऱ्यांविरुद्ध ई-चलनद्वारे दंडात्मक कारवाई केली. जेव्हा पोलिस हटकतात, थांबवितात, त्यावेळी काही जण चुकले, असे म्हणून पळ काढतात; परंतु ही बाब स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात घालणारी ठरू शकते
सुरक्षेसाठी नियम पाळा :
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. कॅमेरे असतानाही अनेक जण वाहतूक नियम मोडतात, हे अनेकदा आढळून आले आहे. रस्ते सुरक्षा निमित्ताने वाहतूक पोलिसांकडून सक्ती म्हणून नाही सुरक्षा म्हणून नियमांचे पालन करा, असे आवाहन करण्यात येत आहे.
दुचाकीवर रील्स धोक्याचे :
मुंबईत काही दिवसांपासून दुचाकीवर जाणाऱ्या मुलांकडून दुचाकीवर रील्स बनवण्याचे प्रकार वाढत आहेत. दुचाकीचा वापर करून मोबाइलवर व्हिडीओ करत असतील, तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. रील्स बनविण्याच्या नादात अपघात होऊ शकतो. त्यामुळे या कारवाई गांभीर्याने घेण्याची गरज आहे.