Join us

‘...तो मोबाईल क्रमांक समीर वानखेडेंचा नाही, तर प्रभाकर साईलचा’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 6:07 AM

आतापर्यंतच्या चौकशीत गोसावी आणि वानखेडे यांच्यात कोणत्याही प्रकारे कॉलवर संभाषण झालेले नसल्याची माहिती  मुंबई पोलिसांची एसआयटी  आणि एनसीबीच्या दक्षता पथकाच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. 

मुंबई : क्रुझ ड्रग्ज पार्टीवरील कारवाईनंतरच्या किरण गोसावीने या कटात पूजा ददलानी किंवा इतरांची दिशाभूल करण्यासाठी प्रभाकर साईलचा नंबर हा ‘एसडब्ल्यू’ (समीर वानखेडे) नावाने सेव्ह केला होता. त्याद्वारे समोरच्या व्यक्तीला गोसावी थेट वानखेडेंच्या संपर्कात असल्याचे भासवत असल्याची माहिती पंच प्रभाकरच्या चौकशीतून समोर आली.ड्रग्ज पार्टीवरील कारवाईनंतर गोसावी आणि वानखेडे यांचे कॉलवर संभाषण झाल्याच्या चर्चेने खळबळ उडाली. मात्र, आतापर्यंतच्या चौकशीत गोसावी आणि वानखेडे यांच्यात कोणत्याही प्रकारे कॉलवर संभाषण झालेले नसल्याची माहिती  मुंबई पोलिसांची एसआयटी  आणि एनसीबीच्या दक्षता पथकाच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. शाहरूख खानची मॅनेजर पूजा ददलानीशी भेटीदरम्यान किरण गोसावीने प्रभाकर साईलला आपल्या मोबाईलवर फोन करायला सांगितले होते. गोसावीने त्यावेळी साईलचा नंबर आपल्या मोबाईलमध्ये समीर वानखेडे यांच्या नावाने सेव्ह केला होता. समोरच्या व्यक्तीला आपण वानखेडे यांच्याशी बोलत असल्याचे भासविण्यासाठी गोसावी हा, ‘सर सर’ करत प्रभाकरशी मोबाईलवर बोलत असे, ही माहितीही प्रभाकरने एनसीबी आणि पोलिसांना दिली आहे. याबाबत तपास यंत्रणा अधिक तपास करत आहेत. त्यामुळे गोसावीच्या चौकशीतून यामागचे गूढ उलगडणार आहे. गोसावी सध्या पुणे पोलिसांच्या कोठडीत आहे. त्याचा ताबा मिळविण्यासाठी एनसीबीकडून न्यायालयात अर्ज करण्यात आला असून, सोमवारी यावर सुनावणी होणार आहे.

टॅग्स :समीर वानखेडेनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो