मोबाइलचा आयएमईआय नंबर बदलणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
By admin | Published: June 13, 2015 10:55 PM2015-06-13T22:55:41+5:302015-06-13T22:55:41+5:30
मोबाईल हँडसेटमधील मुळ आय.एम.ई.आय नंबर बदलवून सॉफ्टवेअरच्या सहाय्याने बनावट आयएमईआय नंबर टाकून देणाऱ्या टोळीचा बोईसर पोलिसांनी पर्दाफाश केला.
बोईसर : हरवलेले व चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्यास तसेच गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना महत्वाचा दुवा ठरणारा मोबाईल हँडसेटमधील मुळ आय.एम.ई.आय नंबर बदलवून सॉफ्टवेअरच्या सहाय्याने बनावट आयएमईआय नंबर टाकून देणाऱ्या टोळीचा बोईसर पोलिसांनी पर्दाफाश केला. यातील चार जणांना अटक केली असून त्यांना १६ जूनपर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहे.
बोईसर रेल्वेस्थानकाजवळील मोबाईल रिपेरींगच्या दुकानात मोबाईलमधील आयएमईआय नंबर बदलून देण्यात येत असल्याची माहिती बोईसर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक महेश पाटील यांना मिळाली. त्यांनी डमी ग्राहक पाठवून भंडारवाडा रस्त्यावरील जीएसएम मोबाईल गॅलरीतील तिघांना पकडले.
एका कंपनीच्या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने व लॅपटॉपद्वारे मोबाईल हँडसेटचा मुळ आयएमईआय नंबर बदलून त्या जागी बनावट नंबर टाकण्यात येत होता. या धाडीमध्ये पोलिसांनी अनेक मोबाईल जप्त केले आहे.
या तीघांची चौकशी केल्यानंतर अवधनगर येथील न्यू पद्मावती मोबाईलमधुनही एकाला अटक केली आहे. या टोळीमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, यासंदर्भात पोलीस चौकशी करीत आहे. (वार्ताहर)