मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील रस्त्यांवर इंधनावर धावणाऱ्या वाहनांमुळे कमालीचे प्रदूषण होते आहे. वाढते प्रदूषण कमी करण्यासह पर्यावरणाचे संवर्धनासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. सीएनजीवर अधिकाधिक भर दिला जात आहे. सीएनजी वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. याचाच एक भाग म्हणून भविष्यात सीएनजीवर धावणाऱ्या वाहनांना विनासायास सीएनजी उपलब्ध व्हावे म्हणून मोबाईल रिफिलिंग सीएनजी युनिट काम करणार आहे.
मोबाईल रिफिलिंग सीएनजी युनिट ट्रायल बेसवर काम करते आहे. मोबाईल रिफिलिंग युनिट हे फिरते आहे. ते कुठेही जाऊ शकते. मॉल असेल. ऑफिसेस असतील, अशा ठिकाणी हे युनिट किंवा मोबाईल व्हॅन उपलब्ध होणार आहेत. थोडक्यात सीएनजी भरण्यासाठी आपल्या स्टेशनवर जावे लागणार तर नाही सीएनजी मोबाईल रिफिलिंग व्हॅन थेट आपल्या दारात येणार आहे, अशी माहिती महानगर गॅसकडून देण्यात आली. मुंबई आणि आसपासच्या परिसरात आठ लाखाहून अधिक वाहने सीएनजीवर धावतात. मुंबई महानगर प्रदेशात महानगर गॅसचे २७४ सीएनजी स्टेशन आहेत. वाहनचालक अधिकाधिक याचा वापर करीत आहेत. विशेषत: नव्याने जी वाहने रस्त्यांवर धावत आहेत, ती बहुतांश वाहने सीएनजीवर धावणारी वाहने आहेत.
महानगर गॅसचे आजघडीला २७४ सीएनजी स्टेशन आहेत. जेथे सीएनजी आजही उपलब्ध नाही तेथे रिटेल उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. विशेषत: रायगड जिल्ह्यात काम केले जात आहे. मुंबई, ठाणे आणि कल्याण येथे सीएनजी रिटेल आऊटलेट्स मोठ्या प्रमाणावर उभारण्यासाठी काम केले जात आहे. मुंबई-गोवा, मुंबई-पुणे, मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावरदेखील सीएनजी स्टेशन बसविले जाणार आहेत. याव्यतिरिक्त बेस्ट, टीएमटी, एनएमएमटी आणि एमएसआरटीसोबतदेखील काम करीत असून, पर्यावरणाचे संवर्धन व्हावे आणि अधिकाधिक वाहने सीएनजीवर यावीत, यासाठी काम केले जात आहे.
भविष्यात अधिकाधिक वाहने सीएनजीवर यावीत म्हणून आऊटलेट्स वाढविण्यावर भर दिला जात आहे. यासाठी जागा असणे आवश्यक आहे. ही जागा मोक्यावरची असावी लागते. अशा जागा हेरत अधिकाधिक सीएनजी स्टेशन वाढविण्यावर भर दिला जात आहे. केवळ खासगी वाहने नाही तर सार्वजनिक वाहतूक सेवा सीएनजीवर धावावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ठाणे, मुंबईत हे काम वेगाने होत आहे. एव्हाना वापरात आहे. आजच्या क्षणी मागणी आणि पुरवठा यात समतोल राखला जातो. शक्य असेल तेवढा गॅसचा पुरवठा केला जातो. ग्रीन मुंबईसाठी सातत्याने काम केले जाते. अधिकाधिक वाहने सीएनजीवर यावीत, यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.