मुंबई : पोषण अभियानांतर्गत दोन वर्षांपूर्वी अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल फोन परत करण्याचे आंदोलन पुकारले आहे. राज्यातून लाखभर फोन परत केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीचे एम. ए. पाटील यांनी दिली.
राज्यात १ लाख ५ हजार ५९२ अंगणवाडी सेविका आहेत. त्यांना पोषण अभियानांतर्गत २०१९ मध्ये मोबाईल फोन दिले होते. स्तनदा माता, गरोदर महिला व बालकांचे वजन, उंची याची माहिती त्यात भरायची होती. मोबाईलचे रॅम कमी पडत आहे.
‘ट्रकर ॲप’ यात डाऊनलोड होत नाही. त्यातील माहिती ‘डीलिट’ करता येत नाही. फोनच्या चार्जिंगमध्ये अडचणी असून मोबाईल सतत हँगसुद्धा होतो. त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी वैयक्तिक मोबाईलमध्ये ट्रॅकर डाऊनलोड करून इतरांच्या मदतीने माहिती भरत आहेत. अंगणवाडी सेविकांनी आता मोबाईल वापसी चळवळ सुरू केली आहे. पुढच्या आठवड्यात सुमारे १ लाख मोबाईल प्रकल्प अधिकाऱ्याकडे जमा करण्यात येतील, अशी माहिती कृती समितीच्या शुभा शमिम यांनी दिली.
शुभा शमिम यांनी सांगितले, सध्याचे मोबाईल निकृष्ट व सदोष असल्यामुळे अंगणवाडी सेविकांना चांगल्या प्रतीचे मोबाईलची मागणी आहे. अंगणवाडी सेविकांना मराठी भाषेमध्ये निर्दोष पोषण ट्रॅकर द्या या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी गेल्या १५ दिवसांत सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांकडे या मागण्या लेखी सादर केल्या आहेत. परंतु शासनाकडून कोणताही प्रतिसाद नाही. या स्थितीत राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांनी मंगळवारपासून (१७ ऑगस्ट) पासून माेर्चाने प्रकल्प कार्यालयात जाऊन सर्व मोबाईल परत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका शासनाने दिलेले निकृष्ट दर्जाचे मोबाईल एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयात परत करणार आहेत. मुंबईत साधारणतः साडेसात हजार ते आठ हजार अंगणवाडी सेविका आहेत. गेली अनेक वर्ष या अंगणवाडी सेविका विविध योजनांचे काम पाहत आहेत, मात्र शासन दरबारी या अंगणवाडी सेविकांच्या पदरी निराशा आल्याचे दिसून येत आहे.