मुंबई : कुर्ला रेल्वे स्थानकात गर्दीच्या वेळी प्रवाशांचे मोबाइल चोरणा-या दुकलीला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. सुरेश चौहाण (२९) आणि त्याचा साथीदार शिवनारायण पाल (२५) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून ७९ हजार रुपयांचे ४ महागडे मोबाइल आणि ४ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. सोमवारी आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती कुर्ला रेल्वे पोलिसांच्या वतीने देण्यात आली.कुर्ला स्थानकात लोकलमधल्या गर्दीत प्रवाशांचे मोबाइल आणि पाकीट चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या. १४ व १५ आॅगस्ट रोजी रोख रक्कम आणि मोबाइल चोरीला गेल्याची तक्रार कांजूरमार्ग येथे राहणाºया राजेश डिसुझा यांनी कुर्ला येथे नोंदवली.तक्रार दाखल केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक बोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलिसांच्या विशेष पथकाची शोधमोहीम सुरू झाली. सीसीटीव्ही फूटेज तपासले असता आरोपी चोरी करीत असल्याचे दृश्य फूटेजमध्ये दिसून आले.तपासादरम्यान सांगितलेल्या वर्णनानुसार कांजूरमार्ग येथून एका संशयिताला अटक करण्यात आली. आरोपीची झडती घेतली असता ३ हजार रुपयांची रोकड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीच्या राहत्या घरातून ७९ हजार रुपये किमतीचे ४ महागडे मोबाइल जप्त करण्यात आले. तसेच त्याच्या साथीदाराला बेड्या ठोकण्यात आल्या.आरोपीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात आणि रेल्वे हद्दीतील विविध पोलिस ठाण्यांत गुन्ह्यांची नोंद असल्याचे तपासात दिसून आले. दरम्यान ४पैकी २ प्रवाशांचे मोबाइल परत देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिसांच्या वतीने देण्यात आली.विशेष पथकाचीधडक कारवाईकुर्ला रेल्वे पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक बोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ऐवळे, हवालदार साळुंखे, पो.ना. संजय नाईक, पो.ना. सतीश सोनावणे या विशेष पथकाने मोबाइल चोरांना बेड्या ठोकल्या.
लोकलमध्ये मोबाइल चोरी करणा-या दुकलीला अटक, रेल्वे पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 5:00 AM