मोबाइल तिकीट, एटीव्हीएमचा विस्तार
By admin | Published: February 29, 2016 02:28 AM2016-02-29T02:28:52+5:302016-02-29T02:28:52+5:30
एटीव्हीएम, मोबाइल तिकीटसेवेचा विस्तार करण्यासाठी साडेचार कोटींचा निधी देण्यात आला असून प्रवाशांची सोय होणार आहे.
मुंबई : एटीव्हीएम, मोबाइल तिकीटसेवेचा विस्तार करण्यासाठी साडेचार कोटींचा निधी देण्यात आला असून प्रवाशांची सोय होणार आहे.
खिडक्यांवरील रांगांमुळे प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी तिष्ठावे लागत असे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी सीव्हीएम कूपन यंत्रणा उपनगरीय लोकल मार्गावर आणण्यात आली. एटीव्हीएम सेवाही सुरू झाली. मात्र, सीव्हीएम कूपनचा लेखाजोगा ठेवण्यातील अडचणी आणि होणारे गैरप्रकार पाहता, एटीव्हीएम सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून मार्च २0१५ रोजी सीव्हीएम कूपन सेवा बंद करण्यात आली.
आता एटीव्हीएम सेवा उपलब्ध होत असताना, पेपरलेस मोबाइल तिकीट सुविधाही देण्यात आली आहे. सध्या मध्य रेल्वेवर जवळपास ३00 एटीव्हीएम असून, त्यांची संख्या आणखी वाढविण्यात येणार आहे, तर मोबाइलवरील अनारक्षित तिकीट सुविधादेखील व्यवस्थित देतानाच त्याचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अर्थसंकल्पात साडे चार कोटींचा निधी मिळाला असल्याची माहीती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. एटीव्हीएमसाठी चार कोटी आणि अनारक्षित तिकीट सुविधांसाठी ५0 लाखांच्या निधीची मंजुरी मिळाली आहे. (प्रतिनिधी)