मुंबई महापालिका आणणार महिलांसाठी स्पेशल स्वच्छतागृह; WiFi, टीव्ही अन् बरंच काही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 10:02 AM2019-09-23T10:02:40+5:302019-09-23T10:04:03+5:30
मुंबई महापालिकेकडून अशाप्रकारचं पहिलं टॉयलेट मरिनड्राइव्ह येथे उभारण्यात येणार आहे. अनेक सुविधांप्रमाणे यामध्ये डिजिटल फिडबॅक मशीनही असणार आहे.
मुंबई - महिलांसाठी स्पेशल स्वच्छतागृह पुण्याच्या धर्तीवर मुंबईतही सुरु करण्याची योजना मुंबई महापालिकेने आणली आहे. 'ती' स्वच्छतागृहांतर्गत वापरात नसलेल्या बसेसचा वापर मोबाइल टॉयलेटमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. या स्वच्छतागृहात वायफाय, टीव्ही यासारख्या अनेक सुविधांसाठी महिलांसाठी देण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेने आखला आहे.
मुंबई महापालिकेकडून अशाप्रकारचं पहिलं टॉयलेट मरिनड्राइव्ह येथे उभारण्यात येणार आहे. अनेक सुविधांप्रमाणे यामध्ये डिजिटल फिडबॅक मशीनही असणार आहे. मुंबई महापालिकेकडून पुण्यातील 'ती' टॉयलेटची सुविधा उपलब्ध करुन देणारे सारा प्लास्ट इंडिया लिमिटेड या कंपनीशी 9 सप्टेंबर रोजी संपर्क साधण्यात आला. ती टॉयलेटसाठी जागा, पाणी आणि वीज याची व्यवस्था करण्याची जबाबदारी महापालिका घेणार आहे. तसेच 1 वर्षापर्यंत पालिका याचा खर्च उचलणार आहे. ड्रेनेज लाइनदेखील बीएमसीची वापरण्यात येईल. या टॉयलेटच्या वापरासाठी प्रति महिला 5 रुपये दर आकारण्यात येणार आहे.
तसेच स्वच्छतागृहामधील पॅकेज उत्पन्न, महिलांसाठी विकणारे उत्पादन तसेच जाहिरातीतून पैसे कमविण्यात येतील. यातील 90 टक्के पैसे बस ऑपरेटर यांना दिले जातील तर 10 टक्के पैसे बीएमसी घेणार आहे. याबाबत बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरुवातीला केवळ बस एकाच जागी उभी राहील. भविष्यात मुंबईतील अनेक भागात ही बस उभी करण्यात येईल. मरिनड्रायव्ह परिसरात बांधकाम करताना हेरिटेज कमिटीची परवानगी घ्यावी लागते त्यामुळे सुरुवातीला ही बस त्याभागात उभी केली जाईल. तसेच या भागात पर्यटकांची संख्या जास्त असल्याने याचा फायदाही होईल. या बसमध्ये महिला सहाय्यक, सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल मशीन, वायफाय, एलईडी स्क्रीन, सेनिटायजर स्प्रे तसेच वापर करणाऱ्यांसाठी तक्रार किंवा सूचना द्याव्यात यासाठी डिजिटल फिडबॅक मशीनदेखील उपल्बध आहेत.
मुंबईत सध्या मुलभूत सुविधांमधील सर्वात महत्वाची मागणी होती ती महिला स्वच्छतागृहांची, अनेक सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षातील महिला नेत्यांनी मुंबईत महिलांसाठी स्वच्छतागृहांची कमतरता असल्याचं सांगितले आहे. महिलांसाठी शौचालय उभारण्यात यावीत अशी मागणी वारंवार केली जाते. जागेची कमतरता आणि सुविधांचा अभाव याचा मध्य मार्ग काढत मुंबई महापालिकेने अशाप्रकारे भंगारातील बसचा वापर करुन महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्याचा प्रयत्नात आहे असं दिसत आहे.