Join us

मोबाईलने EVM हॅक होत नाही, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे स्पष्टीकरण

By मनोहर कुंभेजकर | Published: June 16, 2024 8:22 PM

इव्हीम अनलॉक करायला कोणताही ओटीपी  लागत नाही.

मुंबई-इव्हीम अनलॉक करायला कोणताही ओटीपी  लागत नाही. इव्हीम टेक्निकली फुल प्रूफ सेकयूर असून मोबाईलमुळे इव्हीम हॅक होत नाही, अशी स्पष्टोक्ती २७ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी आज सायंकाळी वांद्रे पूर्व उपनगर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात झालेल्या एका पत्रकार परिषदेत दिली.

मतमोजणीच्या वेळी १५८,जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदार संघातला निवडणूक आयोगाचा डाटा एन्ट्री ऑपरेटर दिनेश गुरव यांनी त्यांचा मोबाईल येथील एका अनोळखी व्यक्तीला दिल्याची तक्रार अपक्ष उमेदवार भरत शाह आणि मोहन अरोरा यांनी आपल्याकडे दिली. त्यावेळी मतमोजणी आपल्यासाठी महत्वाची असल्याने आपण आपल्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत आपण वनराई पोलिसांच्या ताब्यात त्यांना दिले.

त्यानंतर दि,५ रोजी आपण संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा असे पत्र पोलिसांना दिले. आपल्या कडून तक्रार दाखल झाली पाहिजे असे पोलिसांनी आपल्याला दि,११ जून रोजी कळवले.दि,१३ रोजी नायब तहसीलदारांनी वनराई पोलिस ठाण्यात गुरव विरुद्ध रितसर तक्रार केली असून त्याला सेवेतून निलंबित करण्यात आल्याची माहिती सूर्यवंशी यांनी दिली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्धव सेनेचे अमोल कीर्तिकर यांनी आपल्याकडे सीसीटीव्ही फूटेजची मागणी केली होती, मात्र कायदेशीर तरतूदी शिवाय आम्हाला सील केलेले सीसीटीव्ही फूटेज देता येत नाही, न्यायालयाच्या आदेशाशिवाय आम्हाला ते बघता सुद्धा येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विजयी उमेदवार रवींद्र वायकर यांना आपण मदत केली असा विरोधकांचा आपल्यावर आरोप आहे असे विचारले असता,मी पहाटे ५ पासून ते रात्री उशिरा पर्यंत मतमीजणीच्या कामात व्यस्त होते आणि निवडणूक आयोगाच्या नियमांचे तंतोतंत पालन केले.कोणी आरोप करावे हा त्यांचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचे वंदना सूर्यवंशी यांनी सांगितले.

७.५३ मिनीटांनी रवींद्र वायकर हे टपाल मतमोजणीत ४८ मतांनी विजयी झाल्याचे मी घोषित केले,परंतू पराभूत उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा फेरमतमोजणीचा अर्ज हा ८.०६ मिनिटांनी विहित वेळेनंतर आल्याने त्यांचा अर्ज नियमानुसार ग्राह्य धरण्यात आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निकाल जाहिर केल्यानंतर विहित वेळेत दोन मिनिटांमध्ये त्यांनी हरकत घ्यायला हवी होती अशी माहिती त्यांनी दिली.

२६ व्या फेरीनंतर अमोल किर्तीकर हे एक मतानें पुढे होते.मात्र त्यावेळी वायकर यांनी फेरमतमोजणीची मागणी केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.टपाल मतांमध्ये बाद झालेल्या १११ मतांचे रिव्हेरीफिकेशन करण्यात आले. त्यात काही तथ्य आढळले नाही आणि वायकर यांना ४८ मतांनी विजयी घोषित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :एव्हीएम मशीनभारतीय निवडणूक आयोग