रुग्णालयांमध्ये आज मॉकड्रिल; कोरोनाच्या अनुषंगाने सज्जतेची केली जाणार तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 05:16 AM2022-12-27T05:16:27+5:302022-12-27T05:17:30+5:30
केंद्राने काही दिवसांपूर्वीच देशातील सर्व आरोग्य यंत्रणांना मॉकड्रिल घेण्याबाबतचे निर्देश दिले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: कोरोना रुग्णांची संख्या वाढलीच तर रुग्णालयांची तयारी असावी या हेतूने मंगळवारी कोरोनावर उपचार देणाऱ्या सर्व रुग्णालयांतील तयारी तपासण्यासाठी मॉकड्रिल घेण्यात येणार आहे. यामुळे कोरोनाच्या अनुषंगाने राज्य शासन व मुंबई महापालिकेची सर्व रुग्णालये किती प्रमाणात सज्ज आहे याचा आढावा घेण्यात येणार आहे. केंद्राने काही दिवसांपूर्वीच देशातील सर्व आरोग्य यंत्रणांना मॉकड्रिल घेण्याबाबतचे निर्देश दिले होते.
सध्याच्या घडीला देशात आणि राज्यात कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आहे. कोरोनाचा संसर्गाचा फैलाव होत आहे, असे कोणतेही चित्र सध्या शहरात दिसत नाही. मात्र काही देशांमध्ये कोरोनाबाधितांचे आकडे वाढत आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. गेल्या वेळेस झालेल्या चुकांची पुनरावृत्ती नको म्हणून पुरेपूर काळजी घेतली जात आहे.
गेल्या दोन वर्षांच्या अनुभवानंतर आरोग्य यंत्रणांना कशा पद्धतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे क्वचितप्रसंगी गंभीर परिस्थिती उद्भवली तर आरोग्य यंत्रणा या साथीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहावी या हेतूने सगळे प्रयत्न केले जात होते. त्यासाठी हे मॉकड्रिल घेतले जात आहे, या मॉकड्रिलअंतर्गत रुग्णालयातील सर्व व्यवस्थेचा आढावा घेण्यात येणार आहे.
पूर्वी ज्या पद्धतीने मॉकड्रिल घेण्यात आल्या त्या पद्धतीचे मॉकड्रिल नसेल. यावेळचे मॉकड्रिलचे स्वरूप वेगळे असणार आहे. यामध्ये चेकलिस्ट तयार केली जाणार आहे. त्याप्रमाणे, रुग्णालयातील औषधाचा आढावा. ऑक्सिजन प्लांट व्यवस्थित काम करत आहे की नाही याची पाहणी करणे. कोरोनाच्या अनुषंगाने लागणारी सर्व वैद्यकीय यंत्रे कार्यरत आहे की नाही याची पाहणी करणे. व्हेंटिलेटर व्यवस्थितरित्या कार्यान्वित आहे याची माहिती घेणे. वॉर्डमध्ये सर्व लागणारी साधन सामग्री आहे की नाही याचा आढावा घेणे. कोरोनाची चाचणी करण्याची जागा येथे सर्व किट उपलब्ध आहेत आणि प्रयोगशाळा सुसज्ज आहेत की नाही यांची पाहणी करण्यात येणार आहे. - डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महापालिका
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"