Join us

कोरोनाला घाबरू नका, यंत्रणा सक्षम; शासकीय-पालिका रुग्णालयांत मॉकड्रील

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 5:40 AM

कोरोना प्रतिबंधक व नियंत्रण उपाययोजनांच्या पूर्वतयारीची खातरजमा करण्यासाठी शासनाकडून शासकीय आणि पालिका रुग्णालयांमध्ये मॉकड्रील पार पडले.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : नवीन वर्षावर पुन्हा कोरोना संकटाची छाया आहे. त्यामुळे कोविड प्रतिबंधक व नियंत्रण उपाययोजनांच्या पूर्वतयारीची खातरजमा करण्यासाठी शासनाकडून मंगळवारी शासकीय आणि पालिका रुग्णालयांमध्ये  मॉकड्रील पार पडले. यात जेजे रुग्णालय, सेंट जॉर्ज रुग्णालय आणि सेव्हन हिल्स रुग्णालयात कोविड उपचार व्यवस्था यंत्रणा, सुसज्जता आणि इतर उपाययोजनांची रंगीत तालीम घेण्यात आली.

रुग्णालयात आल्यानंतर प्राथमिक उपचारांपासून अंतिम टप्प्यापर्यंत कशा पद्धतीने रुग्णाची सेवा केली पाहिजे, त्याच्यावर कसा प्राथमिक उपचार करायला पाहिजेत, यासंदर्भात आढावा घेण्यात आला. सध्या जेजे रुग्णालयामध्ये १ हजार ३५२ खाटा कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे विलगीकरण खाटा, अतिदक्षता खाटा, ऑक्सिजन पुरवठा, मेडिकल स्टाफ, व्हेंटिलेटर यासारख्या सुविधांची व्यवस्था करणे गरजेचे असल्याने आढावा घेण्यात आला.

राज्यातही ऑनलाइन मॉकड्रील सुसाट ...!

रुग्णालयीन पूर्वतयारीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून मंगळवारी राज्यातील द्वितीय आणि तृतीय स्तरावरील सर्व आरोग्य संस्थांचे ऑनलाइन मॉकड्रील करण्यात आले. सायंकाळपर्यंत १ हजार ३०८ संस्थांनी ऑनलाइन मॉकड्रील पूर्ण केले. त्यात ६१० शासकीय रुग्णालये, ६२८ खासगी रुग्णालये, २८ शासकीय वैद्यकीय आणि २७ खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे.

देशात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे, काळजी करण्याचे कारण नाही. परंतु खबरदारी घेणे गरजेचे आहे. ऑक्सिजन प्लांटपासून ते डॉक्टर, मेडिकल स्टाफ, व्हेंटिलेटर, कॉन्सेंट्रेटर यासारख्या सुविधांची व्यवस्था करणे गरजेचे आहे.  यंदा रुग्ण फार कमी आहेत. नवीन व्हेरियंटचे रुग्ण अद्याप तरी नाहीत. देशात जे रुग्ण आहेत त्यांना नवीन व्हेरियंटची लक्षणे नाहीत.  - डॉ. पल्लवी सापळे, अधिष्ठाता, जेजे रुग्णालय समूह

ऑक्सिजनची उपलब्धता व क्षमता तसेच प्राणवायू वाहून नेणाऱ्या वाहिन्यांची तपासणी, सर्व प्रकारच्या अतिदक्षता विभागांमधील उपकरणे सुव्यवस्थितपणे कार्यरत आहेत याची खातरजमा करण्यात आली. अतिदक्षता उपचारांची आवश्यकता असणारे रुग्ण व अन्य कोविड बाधितांवर एकाचवेळी उपचार करताना पाळावयाच्या वैद्यकीय पद्धती या सर्व मुद्यांवर प्रात्यक्षिके आणि रंगीत तालीम घेण्यात आली. - डॉ. महारुद्र कुंभार, विशेष कार्य अधिकारी, सेव्हन हिल्स रुग्णालय.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबईमुंबई महानगरपालिका