मुंबई : भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीच्या भीषण घटनेनंतर मुंबईतील रुग्णालयांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे अशी दुर्घटना टाळण्यासाठी प्रयत्न सुरू असताना नागरिकांना स्वसंरक्षणाचे धडे मुंबई अग्निशमन दलामार्फत दिले जात आहे. यानिमित्त नायर, सायन आणि कुर्ला भाभा रुग्णालयात नुकतेच मॉकड्रिल पार पडले.
आगीच्या दुर्घटनेवेळी प्रत्येक जण स्वतःचा जीव मुठीत घेऊन पळत सुटतो. यामुळे अनेक वेळा दुर्घटनेची तीव्रता वाढून जीवित-वित्तहानी होते. हे टाळण्यासाठी आग लागल्याचे समजताच बचावकार्य कसे करावे? दुर्घटनेत स्वतःचा व इतरांचा जीव कसा वाचवावा? बचावकार्यासाठी कुठे आणि कसा संपर्क करावा? याचे मॉकड्रिल मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने पालिका रुग्णालयात केले जात आहे.
रुग्णालयच नव्हे तर मॉल, गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवासी, कामगार आणि नागरिकांना अशा दुर्घटनांप्रसंगी कोणती काळजी घ्यावी? प्राथमिक टप्प्यात कोणत्या उपाययोजना, बचावकार्य करावे? याचे प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षण देण्यासाठी अग्निशमन दलाने विशेष पथक तयार केले आहे. या पथकाच्या माध्यमातून नागरिकांना दुर्घटना घडल्यानंतर कॉल कुठे करावा? आगीच्या घटनेत धुराच्या लोळांपासून स्वत:चा बचाव कसा करावा, याचे प्रशिक्षण दिले जात आहे.