दुर्गमित्राकडून विस्मृतीत गेलेल्या मोडी लिपीस नवसंजीवनी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 05:42 AM2019-12-22T05:42:23+5:302019-12-22T05:42:59+5:30
इतिहास संशोधन, संकलनात योगदान । मूळ कागदपत्रे शोधून संकलित करण्यासाठी १२ वर्षांची शोधमोहीम
मुंबई : दुर्गमित्र श्रीदत्त राऊत यांनी सन २००८ साली स्वत:चे राहाते घर, तसेच न्यू इंग्लिश स्कूल वसई आणि राजेंद्र पाखरे माणिकपूर यांचे घर अशा तीन ठिकाणी सुरू केलेले मोडी लिपी वर्ग यंदा तब्बल १२ वर्षांचा अविरत प्रशिक्षणाचा तप पूर्ण करीत आहे. राऊत यांनी विस्मृतीत गेलेल्या मोडी लिपीस केवळ नवसंजीवनी दिली नाही, तर त्यात सातत्याने नवा बदल, संशोधन, प्रगतीची बीजे रोवली. या प्रवासात विद्यार्थी मित्रांची साथ लाभली, शिवाय न्यू इंग्लिश स्कूल वसई शाळेचे मुख्याध्यापक माणिकराव दोतोंडे यांनीही त्यांना साथ दिली.
इतिहासाला साद घालणारी, मराठ्यांनी आत्मसमर्पणाने केलेल्या यज्ञाची यशोगाथा मांडणारी प्राथमिक साधने मोडी लिपीत बंदिस्त झालेली आहेत. मोडी लिपी प्रशिक्षण, संवर्धन, संशोधन याचा विचार करताना एक नाव पुढे येते, ते म्हणजे किल्ले वसई मोहीम परिवार अंतर्गत मोडी लिपी वर्ग संवर्धन व प्रशिक्षण वर्ग. राऊत यांच्या मोडी प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ करण्याचा मानस म्हणजे उत्तर कोकणातील गडकोट, मंदिरे, ऐतिहासिक घटना याबाबत प्राथमिक साधनांतून इतिहास लेखन करणे हा आहे. गेल्या ५० वर्षांत उत्तर कोकणात प्रसिद्ध झालेल्या साहित्याचा लेखाजोगा पाहता, यात मूळ मोडी लिपी प्राथमिक साधने फारशी अंतर्भूत नाहीत. केवळ दुय्यम साधने, आख्यायिका, माहात्म्य, बखरी, कथा, दंतकथा, लेख इत्यादींवर आधारित इतिहास लेखन पूर्णपणे चित्र स्पष्ट करीत नाहीत. परिणामी, राऊत यांनी मूळ कागदपत्रे शोधून संकलित करण्यासाठी तब्बल १२ वर्षे शोध मोहीम घेतली.
शोध मोहिमेत इतिहास संशोधन लेखनासोबतच मोडी लिपी संशोधनपर लेखमाला प्रसिद्ध करून स्थानिक, तसेच महाराष्ट्र प्रांतातील मोडी अभ्यासकांना एक नवीन पर्वणी उपलब्ध करून दिली. मोडी लिपी वर्गातील वाढता संशोधनपर प्रतिसाद पाहता, दीड वर्षांपूर्वी उत्तर कोकण मोडी लिपी मंडळाची स्थापना करण्यात आली. यात विष्णुप्रिया कुलकर्णी, प्रवीण कुलकर्णी, तेजस्वी कुलकर्णी यांचे योगदान आहे. या संशोधन लेख मालिकेत तुंगारेश्वर देवस्थान, निर्मळ विमल देवस्थान, गोखिवरे देवस्थान, जंजिरे वसई कोट, जंजिरे अर्नाळा, भवानी देवी मंदिर, वसई प्रांतातील पेशवेकालीन घडामोडींची साक्षीदार गावे, १८व्या शतकातील एका लग्नाची गोष्ट, श्री वज्रयोगिनी वज्रेश्वरी देवस्थान इत्यादी अमूल्य कागदपत्रांचा शोध घेऊन इतिहास संशोधन व संकलनात मोलाचे योगदान दिले आहे.
गावांची स्थानिक अभ्यासकांना होणार नव्याने ओळख
च्लुप्त गावे व त्यातील सामाजिक ऐतिहासिक घडामोडी यावर मंडळाकडून लेखन सुरू असून, या नव्या संशोधनाद्वारे विस्मृतीत गेलेल्या अनेक गावांची स्थानिक अभ्यासकांना नव्याने ओळख करून घेणे शक्य होणार आहे.
च्पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक भागातील मोडी लिपी संशोधनाच्या पाऊलखुणा काही कोटींच्या संख्येने असल्या, तरी त्यातील खारीचा वाटा संकलित, संशोधित करण्याचे काम राऊत सहकारी विद्यार्थी मित्रांना प्रेरित करून करत आहेत.
च्प्रारंभी अगदीच मोजक्याच छायांकित प्रतीच्या आधारे सुरू झालेली वाटचाल आता ७०० हून अधिक मोडी लिपी कागदपत्रांच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांना मार्गदर्शन करीत आहेत.