मुंबईकरांना दिलासा! मोडक सागर, तानसा तलाव ओव्हरफ्लो; तलाव क्षेत्रावर वरुणराजाची कृपादृष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 05:03 PM2021-07-22T17:03:13+5:302021-07-22T17:04:16+5:30
मोडक-सागर व तानसा तलाव ओसंडून वाहू लागला; ७ तलावांमध्ये ५३.८६ टक्के जलसाठा उपलब्ध
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका दररोज ३८५ कोटी लीटर (३,८५० दशलक्ष लीटर) एवढा पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जातो. हा पाणीपुरवठा ज्या ७ तलावांमधून केला जातो, त्यापैकी मोडक-सागर तलाव हा आज मध्यरात्री ०३.२४ वाजता, तर तानसा तलाव हा आज पहाटे ०५.४८ वाजता ओसंडून वाहू लागला आहे.
यानंतर मोडक-सागर तलावाचे २ दरवाजे, तर तानसा तलावाचा १ दरवाजा उघडण्यात आला आहे. मोडक-सागर तलाव गेल्यावर्षी म्हणजेच सन २०२० मध्ये १८ ऑगस्ट रोजी रात्री ०९.२४ वाजता ओसंडून वाहू लागला होता. तर तानसा तलाव हा दिनांक २० ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ०७.०५ वाजता पूर्ण भरुन वाहू लागला होता. या व्यतिरिक्त यंदाच्या वर्षी तुळशी तलाव व विहार तलाव, हे २ तलाव अनुक्रमे १६ जुलै आणि १८ जुलै २०२१ रोजी पूर्ण भरुन वाहू लागले आहेत. यानुसार यंदाच्या पावसाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी ४ तलाव पूर्ण भरुन वाहू लागले आहेत.
यापूर्वी वर्ष २०१९ मध्ये मोडक-सागर तलाव हा २६ जुलै रोजी भरुन वाहू लागला होता. तर त्यापूर्वी सन २०१८ व २०१७ असे दोन्ही वर्ष हा तलाव १५ जुलै रोजी आणि सन २०१६ मध्ये ०१ ऑगस्ट रोजी पूर्ण भरुन वाहू लागला होता. तसेच तानसा तलाव हा २०१९ मध्ये २५ जुलै रोजी, २०१८ मध्ये १७ जुलै रोजी, २१७ मध्ये १८ जुलै रोजी आणि सन २०१६ मध्ये ०२ ऑगस्ट रोजी भरुन वाहू लागला होता.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी असून यामध्ये आज पहाटे ६.०० वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार ७७,९५६.८ कोटी लीटर (७,७९,५६८ दशलक्ष लीटर) इतका म्हणजेच ५३.८६ टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. या अंतर्गत अप्पर वैतरणा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या ४.३१ टक्के अर्थात ९७८ कोटी लीटर (९,७८० दशलक्ष लीटर), मोडक-सागर तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या १०० टक्के अर्थात १२,८९२.५ कोटी लीटर (१,२८,९२५ दशलक्ष लीटर), तानसा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या ९९.६६ टक्के अर्थात १४,४५९.३ कोटी लीटर (१,४४,५९३ दशलक्ष लीटर), ‘हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’मध्ये (मध्य वैतरणा) पाणी साठवण क्षमतेच्या ४७.७१ टक्के अर्थात ९,२३४.२ कोटी लीटर (९२,३४२ दशलक्ष लीटर), भातसा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या ५१.३५ टक्के अर्थात ३६,८१८.४ कोटी लीटर (३,६८,१८४ दशलक्ष लीटर), विहार तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या १०० टक्के अर्थात २,७६९.८ कोटी लीटर (२७,६९८ दशलक्ष लीटर) आणि तुळशी तलावामध्ये देखील पाणी साठवण क्षमतेच्या १०० टक्के अर्थात ८०४.६ कोटी लीटर (८,०४६ दशलक्ष लीटर) एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.