मुंबई पालिका शिक्षण विभागाचे मॉडेल राज्यातील विद्यार्थ्यांसाठी खुले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 03:11 AM2020-09-18T03:11:41+5:302020-09-18T03:12:09+5:30
कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे सध्यस्थितीत राज्यात शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था बंद आहेत.
मुंबई : मुंबई महापालिका शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या आॅनलाइन शिक्षणासाठी केले जाणारे प्रयत्न उत्तम दर्जाचे असून त्याचा उपयोग राज्याच्या इतर जिल्ह्यांतील आणि क्षेत्रातील विद्यार्थ्यांनाही आता होऊ शकेल. पहिली ते दहावी इयत्तेतील, राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई मंडळाचा तसेच मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू अशा कोणत्याही माध्यमातून शिक्षण घेणारा राज्यातील कोणताही विद्यार्थी पालिकेच्या आॅनलाइन वर्गाला हजेरी लावू शकेल.
कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे सध्यस्थितीत राज्यात शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था बंद आहेत. मुंबई पालिका शाळांत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या ४ माध्यमांचे राज्य मंडळाचे, आयसीएसई, सीबीएसई अभ्यासक्रमाचे वर्ग प्रशिक्षित विषय शिक्षकांमार्फत आॅनलाइन सुरू आहेत. ४० झूम लिंक्सद्वारे हे वर्ग घेण्यात येतात. प्रत्येकाची क्षमता ५०० इतकी असल्याची माहिती शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली. आता राज्यातील इतर विद्यार्थीही अर्ज करून येथे आॅनलाइन हजेरी लावू शकतील.
४५ मिनिटांच्या दोन तासिका
- मराठी , हिंदी , इंग्रजी , उर्दू माध्यमाच्या पहिली ते आठवीच्या वर्गांच्या ४५ मिनिटांच्या २ तासिका सध्यस्थितीत पालिका शिक्षण विभागामार्फत घेण्यात येतात.
- आठवड्यातून प्रत्येक इयत्तानिहाय आणि विषयनिहाय तासिकांचे आयोजन पालिका शिक्षण विभाग करते.
- नववी आणि दहावीच्या तासिकांची संख्या ४ असून या प्रत्येक तासिकेत १० मिनिटांचा ब्रेक विद्यार्थ्यांना दिला जातो. या तासिकांचे लाइव्ह सेशन आयोजित करण्यात येते.
- आॅनलाइन तासिकांचे रेकॉर्डेड सेशन पालिकेच्या यूट्युब चॅनेलवर पाहता येते. या तासिकांसाठी तब्बल ३९६ प्रशिक्षित शिक्षक आहेत.