मुंबई : भाडे नाकारणे, प्रवाशांशी उद्धटपणे वागणे इत्यादी कारणांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी अंधेरी आरटीओने एक उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाद्वारे आदर्श रिक्षा, टॅक्सी चालकाची निवड केली जाणार आहे. वांद्रे ते दहिसरमधील चालकांची निवड केली जाणार असून, त्यासाठी ३१ आॅगस्टपर्यंत अर्ज पाठवण्याचे आवाहन केले आहे. प्रामाणिकपणे सेवा देणे, आपल्या मुलांना उच्चशिक्षण देणे, अपघातग्रस्तांना मदत करणे, उल्लेखनीय सामाजिक कार्य करणे, असे काम करणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांना आदर्श पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती, मुंबई पश्चिम विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी एम.बी.जाधव यांनी सांगितले. एक पुरस्कारप्राप्त चालकांना अडीच हजार रुपये, एक लाख रुपयांचा वैयक्तिक विमा, त्यांच्या कुटुंबीयाला मोफत वैद्यकीय सेवा, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या निकषात बसणाऱ्या व पुरस्कारासाठी इच्छुक असलेल्या रिक्षा व टॅक्सी चालकांनी, आपले नाव, वय, जन्मतारीख, सेवेचा एकूण कालावधी, पार्श्वभूमी, परवाना व बिल्ला क्रमांक, रिक्षा व टॅक्सी क्रमांक, शिक्षण व उल्लेखनीय कामांची माहिती असा तपशील द्यावा लागेल, असे जाधव म्हणाले.आरटीओ व रोटरी क्लब आॅफ बॉम्बे ईस्ट यांच्या संयुक्तपणे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सर्व माहिती मुंबई पश्चिम विभाग आरटीओ कार्यालय, मनीषनगर अंधेरी पश्चिम येथे प्रत्यक्ष किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)पुरस्कारासाठी इच्छुक असलेल्या रिक्षा व टॅक्सी चालकांनी, आपले नाव, वय, जन्मतारीख, सेवेचा एकूण कालावधी, पार्श्वभूमी, परवाना व बिल्ला क्रमांक, रिक्षा व टॅक्सी क्रमांक, शिक्षण व उल्लेखनीय कामांची माहिती असा तपशील द्यावा लागेल.
आदर्श रिक्षा, टॅक्सी चालकाला पुरस्कार
By admin | Published: July 29, 2016 1:56 AM